'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Manoj jarange Patil on Prakash Shendge : प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कट कारस्थान करत आहेत, असे प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी प्रकाश शेंडगेंना दिले आहे.
Manoj jarange Patil on Prakash Shendge : सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालत गाडीवर शाईफेक करण्यात आली. मराठा समाजाच्या नादी लागू नका, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही,अशा आशयाचे पत्र गाडीवर लावण्यात आलं आहे. यावरून प्रकाश शेंडगे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी, शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रकाश शेंडगे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, असे कुणीच कुणाशी करू नये. प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे. काही जण असे आहेत की, ते स्वतः करतात आणि मराठ्यांवर नाव घेत आहेत. काही जण सहानुभूती मिळवण्यासाठी असे कट कारस्थान करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट - मनोज जरांगे
मराठा असो, ओबीसी असो असे कुणी नाही केलं पाहिजे, असे व्हायला नको. मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? ते ही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहेत. हा स्टंट असू शकतो. त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नको, असे प्रत्युत्तर त्यांनी प्रकाश शेंडगे यांना दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते प्रकाश शेंडगे?
कवठेमहांकाळ येथे आमचे कार्यकर्ते प्रचार करत होते. त्यावेळी मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायम आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद मराठवाड्यात पेटला असताना सांगली शांत होती. आता मला धमकी आणि इशारा देण्यात आला आहे. निवडणूक मुक्त वातावरणात झाली पाहिजे. ही लोकशाही आहे. मते मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. अशा घटनांमुळे विनाकारण सांगलीतील सामाजिक समतोल बिघडत चाललाय. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक शांततेत पार पाडावी, ही माझी विनंती आहे. कुठलाही वाद करण्याची आमची इच्छा नाही. या घटनेची निवडणूक आयोग आणि पोलिसांत तक्रार करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा