(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange :संभाजीनगरात आज मनोज जरांगेंच्या 14 ऑक्टोबरच्या सभेचा ट्रेलर; होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सभेला शहर व ग्रामीण भागातून एक लाखापेक्षा अधिक महिला व पुरूष सहभागी होण्याचा दावा करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज (10 ऑक्टोबर) रोजी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात भव्य सभा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता येथील विभागीय क्रीडा संकुल येथे ही जाहीर सभा होत आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून सकल मराठा समाजाच्या वतीने सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला शहर व ग्रामीण भागातून एक लाखापेक्षा अधिक महिला व पुरूष सहभागी होण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटी गावात होणाऱ्या सभेचं हे ट्रेलर असणार असल्याचे बोलले जात आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली आहे. या 40 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुदत यावेळी देण्यात आली आहे. तर, 14 ऑक्टोबरला सरकारला देण्यात आलेल्या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे या निमित्ताने अंतरवाली सराटी गावात 14 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी जरांगे राज्याचा दौरा करत असून, आज ते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांची आज सभा देखील होणार आहे. विशेष म्हणजे या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
तीच मागणी, तोच शहर अन् गर्दीही...
कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघाले. याच मोर्च्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हा पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरात निघाला होता. त्यावेळी देखील लाखोंची गर्दी पाहायला मिळाली होती. आता पुन्हा त्याचं छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांची सभा होत असून, तशीच गर्दी या सभेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शहरातील वाहतूक बदल...
- पोलिसांनी काही मार्ग दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत बंद ठेवले आहे.
- सुतगिरणी चौक ते दर्गा चौक बंद राहणार आहे.
- गोपाल टी पॉइंट ते सिल्लेखाना चौकापर्यंत रस्ता बंद राहणार आहे.
- क्रांती चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा सर्वेसर रोड बंद राहणार आहे.
वाहनांसाठी पर्यायी मार्ग असे
- सूतगिरणी चौक-जानकी हॉटेल चौक-वाणी मंगल कार्यालय- शिवाजीनगर रेल्वेपटरी मार्गे देवळाई चौक बीड बायपासकडे जाता येईल.
- दर्गा चौक-संग्रामनगर उड्डाणपूल- गोदावरी टी पॉइंट- बीड बायपासकडे जाता येईल.
- क्रांती चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.