Chhatrapati Sambhajinagar: अपघाताचे फोटो काढणे जिवावर बेतले, भरधाव वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू
Accident News: ही घटना शुक्रवारी (3 मार्च) रोजी हर्सूल रोडवरील मधुरा लॉन्ससमोर घडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Accident News: अनेकदा रस्त्यावर अपघात झाल्यावर उपस्थित नागरिक अपघाताचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करतात. मात्र छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एका शेतकऱ्याला अपघाताचे फोटो काढणे जिवावर बेतले आहे. कारण अपघाताचे फोटो काढत असतानाच भरधाव वाहनाच्या धडकेत या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (3 मार्च) रोजी हर्सूल रोडवरील मधुरा लॉन्ससमोर घडली आहे. बाबासाहेब अंबादास काळुसे (वय 53 वर्षे) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका दुचाकीस्वारास वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात आपल्या भावाचा मेव्हणा जखमी झाल्याचे कळताच जाधववाडीतील शेतकरी बाबासाहेब अंबादास काळुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर घटनास्थळी पोहचताच ते दुभाजक ओलांडून अपघातस्थळी गेले. दरम्यान, अपघातस्थळाचे ते फोटो काढायला लागले. मात्र अपघाताचे फोटो काढत असताना सावंगी येथून भरधाव आलेल्या कारने (एमएच 03 बीजे 7515) त्यांना जोराची धडक दिली.
फोटो काढत असताना बाबासाहेब यांना कारने जोराची धडक दिल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात सुरेश अंबादास काळुसे यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.
समृद्धी महामार्गावरून ट्रक कोसळला, दोघांचा मृत्यू
दरम्यान दुसऱ्या एका अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गंगापूरच्या फतियाबाद येथे झाली आहेत. समृद्धी महामार्गावरील पुलावरून रसायनाचे बॅरल घेऊन जाणारा ट्रक कठडे तोडून खाली कोसळला. त्यानंतर खाली पडलेला ट्रक पेटल्याने चालक आणि कलिनरचा होर पळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. सोहेल खान इस्माईल खान (वय 32 वर्षे) असे चालकाचे तर नौशाद ऊर्फ लाला (भिलाई, जि. दुर्ग, छत्तीसगड) असे मृत क्लिनरचे नाव आहे.
मुंबई येथून नागपूरच्या दिशेने रसायनाचे बॅरल आणि कंपनीचे इतर साहित्य घेऊन जाणारा मालवाहू ट्रक वेरूळ इंटरचेंजच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोकुळवाडी येथील समृद्धीच्या पुलाजवळ आला. चालकाला रात्री अंदाज न आल्याने सुरक्षा भिंत तोडून ट्रक पुलाच्या मधोमध असलेल्या पोकळीमधून खाली कोसळला आणि पेट घेतला. यात होरपळून चालक आणि वलिनरचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाच्या पाच ते सहा अग्निशामक वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नाही. छत्रपती संभाजीनगर येथून महापालिकेच्या अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. पोलीस आणि ग्रामस्थांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
छ. संभाजीनगरात थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या पथकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल