Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमधील 100 फूट रस्ता अतिक्रमणमुक्त, महानगरपालिकेकडून 40 अतिक्रमणे जमीनदोस्त
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे या कारवाईत 100 फूट रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून (Sambhaji Nagar Municipal Corporation) सतत अतिक्रमण विरोधात कारवाई केली जात आहे. दरम्यान मनपा अतिक्रमण हटाव विभागमार्फत पुन्हा एकदा 40 अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही या सत्रातील सर्वात मोठी कारवाई ठरली असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील रोजा बाग चौक, उद्धवराव पाटील चौक, हिमायत बाग चौक एन-12 या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत 100 फुट रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचे आदेशानुसार शहरात सातत्याने अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू आहे. याच अनुषंगाने एन-12 परिसरातील उद्धव पाटील चौक ते मौलाना आझाद कॉलेजलगत सर्व 100 फुटी रस्त्यावर एकूण 40 अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या 40 अतिक्रमण धारकांमध्ये 25 अतिक्रमण धारकांनी या ठिकाणी सर्रास खुलेआम 15 बाय 15 व 25 बाय 15 या आकाराचे पक्के बांधकाम केले होते. तसेच या ठिकाणी सर्व प्रकारचे बाजारपेठ थाटले होते. विशेष म्हणजे काही भूमाफीया आणि काही टपरी भूमाफिया हे भाडे वसूल करत होते. या चौकात अनेक वेळा वाहतुक खोळंबून भांडण झालेली आहेत. या परिसरात सर्व व्हीआयपी बंगले आणि व्हीआयपी कॉलनी असल्याने या भागातील नागरिक या अतिक्रमण धारकांना वैतागले होते.
त्यामुळे महानगरपालिकेने या भागात मोहीम राबवत कारवाई केली आहे. दरम्यान यावेळी अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढणे सुरुवात केली. परंतु काही टपरी माफिया कोण आता है हम देखते है असे सांगत विरोध करत होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी आधी समजून सांगितले, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे अतिक्रमणधारक तेथून पळून गेले.
अतिक्रमण निघाल्यामुळे रस्ता झाला मोठा...
मनपाच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने पूर्ण कारवाई केली आहे. अतिक्रमण कारवाई वेळी या भागात अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. अतिक्रमण निघाल्यामुळे व रस्ता मोठा झाल्यामुळे स्थानिकांनी महापालिकाचे अभिनंदन केले. अतिक्रमणामुळे या ठिकाणी टवाळखोर आणि पान टपरीवर काही तरुण उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना सुद्धा त्रास देत होते. अशा तक्रारी सुद्धा पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत अतिक्रमण काढल्याने आज सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि आज जवळपास 40 लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बतम्या: