Sanjay Raut: संजय राऊतांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस
Sanjay Raut : आता यावर संजय राऊत यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता असून, राऊत यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबतीत वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) 'लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेश'नचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी संजय राऊत यांना ही नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता यावर संजय राऊत यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे- ठाकरे गटाकडून सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून रोज शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला जातो. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तर खोचक शब्दात टीकाही अनेकदा केली आहे. दरम्यान याच टिकेवरून संजय राऊत यांना छत्रपती संभाजीनगरचे अमर विनायक लोखंडे यांनी 100 कोटींच्या मानहानीची नोटिस आपल्या वकिलामार्फत पाठवली आहे. ज्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत संजय राऊत यांनी वेळोवेळी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात चाटुगिरीचे वक्तव्य केल्याने समाजात त्यांचा अवमान झाल्याचा आरोप देखील लोखंडे यांनी या नोटीसमध्ये केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा नोटीस पाठवणारे अमर लोखंडे यांनी केला आहे.
संजय राऊत यांना आरोपी केले पाहिजे...
भाजपच्याच राज्यात दंगली कशा घडतात, कारण त्यांच्याकडून अशा दंगली घडवून आणल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी असे बोलणे म्हणजेच पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य आहे. यापूर्वी देखील अशा जेव्हा घटना घडल्या आणि त्यावेळी विरोधीपक्षात असताना आम्ही संजय राऊत यांच्यासारख्या वायात विधानं केली नाही. त्यामुळे राज्याचे सामजिक वातावरण खराब करण्याचे काम राऊत करत आहे. त्यामुळे यावरून आणखी काही वाईट घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडल्यास संजय राऊत यांना देखील आरोपी केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! ...तर तीन महिन्यांत महापालिका निवडणुका शक्य; भाजप मंत्र्याचं मोठं वक्तव्य