(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भर कार्यक्रमात वरिष्ठ न्यायमूर्तींना हात धरून उठवलं, चूक लक्षात येताच वृत्तपत्रातून 'माफीनामा'
Chhatrapati Sambhaji Nagar : याबाबत माध्यमांनामध्ये वृत्त येताच संबंधीत विभागाने आणि आयोजकांनी आता वृत्तपत्रातून थेट जाहीर माफीनामा लिहत माफी मागितली आहे.
छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे (Verul-Ajantha International Festival) आयोजन करण्यात आले आहे. 2 , 3 आणि 4 फेब्रुवारीदरम्यान भरतनाट्यम्, कथ्थक, फ्युजन, सूफी, मराठी व बॉलिवूड गीतांचा मेळा रंगणार आहे. मात्र, हाच महोत्सव एका वेगळ्याचे कारणाने चर्चेत आला आहे. कारण, याच महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या औरंगाबाद खंडपीठातील (Aurangabad Bench) एका वरिष्ठ न्यायमूर्तींना चक्क हात धरून उठवून मागच्या खुर्चीवर जाऊन बसण्याचे सांगण्यात आले. याबाबत माध्यमांनामध्ये वृत्त येताच संबंधीत विभागाने आणि आयोजकांनी आता वृत्तपत्रातून थेट जाहीर माफीनामा लिहत माफी मागितली आहे.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात यंदा दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात डॉ. संध्या पुरेचा, राहुल देशपांडे, पंडिता अनुराधा पाल, अमान- अयान अली, कैलाश खेर आणि श्रेया घोषाल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यानं ती ओळख अधिक दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. यासाठी अनेक महत्वाच्या लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात खंडपीठातील वरिष्ठ न्यायमूर्तींसह इतर न्यायमूर्ती यांना आमंत्रण देण्यात आले होते.
न्यायमूर्तींचे हात धरून उठून मागील रांगेत जाऊन बसण्यास सांगितले...
कार्यक्रम सुरु असतानाच पहिल्या रांगेतील सोफ्यावर बसलेल्या वरिष्ठ न्यायमूर्तींकडे एक गार्ड पोहचला. तसेच या गार्डने चक्क वरिष्ठ न्यायमूर्तींचे हात धरून उठून मागील रांगेत जाऊन बसण्यास सांगितले. हा सर्व प्रकार पाहून मागे बसलेले इतर न्यायमूर्ती उठून उभे राहिले. तसेच, वरिष्ठ न्यायमूर्तींसह सर्वच न्यायमूर्ती सहकुटुंब हा कार्यक्रम सोडून निघून गेले. हा सर्व प्रकार संयोजकांच्या लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायमूर्तींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘यापुढे आम्हाला कार्यक्रमाला आमंत्रित करू नका’, असे म्हणत न्यायमूर्ती कार्यक्रमातून निघून गेले. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिले.
जाहीर माफीनामा...
आता या सर्व घटनेनंतर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पर्यटन विभाग उपसंचालक, वेरूळ- अजिंठा महोत्सव समिती यांच्याकडून वृत्तपत्रातून थेट जाहीर माफीनामा लिहत माफी मागण्यात आली आहे. ज्यात म्हटले आहे की, “वेरूळ-अजिंठा महोत्सव 2024 सोनेरी महाल, छत्रपती संभाजीनगर येथे दि.02.02. 2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथील सन्माननिय न्यायमुर्ती व त्यांचे कुटुंबीय यांना योग्य प्रकारे आसन व्यवस्था न झाल्याने तसेच त्यांचे सोबत झालेल्या असुविधांसाठी वेरुळ अजिंठा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने जाहीर दिलगीरी व्यक्त करण्यात येते. तसेच या निवेदनाद्वारे मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबादचे सर्व सन्माननिय न्यायमूर्ती व त्यांचे कुटुंबीय यांची वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजन समितीतर्फे जाहीर माफी मागण्यात येत आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या :
Tehsildars Transfers : मराठवाड्यातील 27 तहसीलदारांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली बदली?