अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती; संभाजीनगरच्या सिडको परिसरात कलम 144 लागू, मोठा पोलीस बंदोबस्त
Chhatrapati Sambhaji Nagar : अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात.
![अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती; संभाजीनगरच्या सिडको परिसरात कलम 144 लागू, मोठा पोलीस बंदोबस्त Chhatrapati Sambhaji Nagar CIDCO area Section 144 applicable Gas leakage from accident gas tanker martahi news अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती; संभाजीनगरच्या सिडको परिसरात कलम 144 लागू, मोठा पोलीस बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/01/b3a304fba4c40be7813bd178237225fd1706776039043737_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक चौक उड्डान पुलाजवळ एन-4 सिडको या ठिकाणी एच.पी.कंपनीचे गँस टँकरला अपघात (Accident) झाला आहे. या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असून, सदर गॅस हवेमध्ये पसरलेला असून, अजूनही पसरत आहे. या अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने असल्याने मोठ्या प्रमाणात लोक राहतात. तसेच लोक जमा होत आहेत. सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेता या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे.
शहरातील सिडको एन-3, एन-4, एन-5 परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी निर्गमित केले आहे. सदरील आदेश दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळ पासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईल त्या कालावधी पर्यंत अंमलात राहिल. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.
औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज बंद...
ज्या भागात हा अपघात झाला आहेत त्यापासून औरंगाबाद खंडपीठ जवळच आहे. विशेष म्हणजे खंडपीठात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच, खंडपीठात येणाऱ्या नागरिकांना जालना रोडमार्गे यावे लागते. दरम्यान, हा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे, आज औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया...
संबंधित गॅस कंपनीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. कंपनीचे पथक देखील घटनास्थळी पोहचले आहेत. 18 टन पैकी 2 टन गॅस लिकेज झाला आहे. उर्वरित गॅस अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे. ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून, पुढील 15 ते 20 मिनटात अपघातग्रस्त टँकरमधील सर्व गॅस खाली करण्यात येणार आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि पोलीस आयुक्त मनोज लोहिया स्वतः घटनास्थळी थांबून आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून एक किलोमीटर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन...
जालना रोडवर एन-3 परिसरात गॅस टँकर उलटला असून, त्यातून गॅस गळती होत आहे. त्यामुळे जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जालना रोडवर जाऊ नका. पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करा. सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये. ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
संभाजीनगरात गॅसचा टँकर उलटला, परिसरातील लाईट-रस्ते बंद; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)