Chhatrapati Sambhaji Nagar: पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळाला पण नाल्यात जाऊन अडकला; गणवेशासह नाल्यात उतरून पोलिसांनी घेतलं ताब्यात
Chhatrapati Sambhaji Nagar : पोलिसांना अंगावरील गणवेशासह नाल्यात उतरून आरोपीला ताब्यात घ्यावे लागले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक असलेला आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार झाला. नेहमी गजबजलेल्या असलेल्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात भर दिवसा हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी या आरोपीचा पाठलाग करताच तो नाल्यात जाऊन पडला. त्यामुळे पोलिसांना अंगावरील गणवेशासह नाल्यात उतरून त्याला ताब्यात घ्यावे लागले. लखन प्रल्हाद मिसाळ असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लखन मिसाळवर जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात कलम 307 म्हणजेच जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे तो न्यायालयीन कोठडीत होता. तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या लखनला जालना पोलिसांचे 3 कर्मचारी आज वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात घेऊन आले होते. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याची एमआरआय चाचणी केली जाणार होती. मात्र रुग्णालय परिसरात आल्यावर लखन हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पसार झाला. जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक असलेला आरोप पसार झाल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिसांच्या तावडीतून महत्वाचा गुन्हेगार पळून गेल्याची बाब कळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. महत्वाचा आरोपी पसार झाल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले. त्यामुळे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ घाटी रुग्णालयात तैनात असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली. याचवेळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळालेला आरोपी रुग्णालयाशेजारील नाल्याच्या दिशेने निघाला आणि धावताना नाल्यात जाऊन पडला. त्यामुळे पोलिसांवर देखील नाल्यात उतरण्याची वेळ आली. आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शेवटी गणवेशासह नाल्यात उतरले आणि पुन्हा त्याला ताब्यात घेतेले. तर या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
पोलिसांची एकच धावपळ...
छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात नेहमीच गर्दी असते. तर वेगेवेगळ्या पोलीस ठाण्यातील आणि हर्सूल कारागृहात असलेल्या आरोपींना रुटिंग चेकअपसाठी या ठिकाणी आणले जातात. दरम्यान महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी लखन मिसाळला देखील पोलीस तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र त्याने संधी साधत पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. महत्वाच्या गुन्ह्यातील आरोपी आपल्या ताब्यातून पळाल्याने पोलिसांना अक्षरशः घाम फुटला होता. मात्र आरोपी हा नाल्यात पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि त्याला ताब्यात घेतलं.
इतर महत्वाच्या बातम्या: