BJP : भुमरे खासदार बनले, आता पालकमंत्रिपद आपल्या नेत्याला द्या , भाजप पदाधिकाऱ्यांचं देवेंद्र फडणवीसांना साकडं
BJP News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदिपान भुमरे खासदार बनल्यानं त्यांच्याकडे असणारं जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कुणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवला आहे. शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) विजयी झाले आहेत. संदिपान भुमरे यांनी लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील आणि चंद्रकात खैरे यांचा पराभव केला. संदिपान भुमरे यांच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानं भुमरे यांना आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद मिळावं, अशी भूमिका घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद भाजपला द्या अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना संभाजीनगरचं पालकमंत्री करावं, आम्ही शिवसेनेचा खासदार निवडून आला आता आम्हाला पालकमंत्री पद द्यायला हवं, असं संजय केणेकर म्हणाले.
संजय केणेकर काय म्हणाले?
आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर अतुल सावे यांची वर्णी लागावी, अशी मागणी घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनतीनं आणि ताकदीनं काम करुन पालकमंत्री संदिपान भुमरे यांना निवडून दिलं. भुमरे यांच्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा असल्यानं, त्यांच्या जागी अतुल सावे यांची वर्णी लागावी, असं संजय केणेकर म्हणाले.
अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चांगली कामं केली आहेत, संजय केणेकर म्हणाले. अतुल सावे जिल्ह्यासाठी आणि परिसरासाठी चांगल्या पद्धतीनं काम करु शकतील. विकास साधू शकतील, त्यामुळं त्यांना संधी मिळावी, असं संजय केणेकर म्हणाले. भाजपला देखील खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. जिल्ह्यातील सर्व कामं योग्य पद्धतीनं होतील, असं केणेकर म्हणाले. आम्ही यासाठी रेटा लावून आहोत, त्यात यशस्वी होऊ असं संजय केणेकर म्हणाले.
संदिपान भुमरे लोकसभेत, पालकमंत्री कोण होणार?
लोकसभा निवडणुकीत महायुतीनं छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात विजय मिळवला. शिवसेनेचे संदिपान भुमरे यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली अन् ते विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. आता संदिपान भुमरे लोकसभेत गेल्यानंतर भुमरे यांचं मंत्रिपद कुणाला मिळणार आणि छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :