(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! सत्ताधारी भाजप-शिंदे गट आमने-सामने; थेट एकेमकांना बॅनर लावून दिले उत्तर
BJP Vs Shinde Group : मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतलेल्या भुमिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. असे असतानाच आता सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे नेते थेट एकेमकांच्या विरोधात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्या मुलाने सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. तर, दुसरीकडे हा मोर्चा स्टंटबाजी असल्याचे म्हणत भाजपने दुष्काळ (Drought) जाहीर केल्याचे म्हणत सरकारचे स्वागत करणारे बॅनर लावले आहे.
मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये दुष्काळ जाहीर करण्यावरून या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये जुंपली आहे. एकीकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलाने दुष्काळ जाहीर करावा यासाठी आज मोर्चा काढला होता. तर, दुसरीकडे सिल्लोड तहसील कार्यालयावर भाजपच्यावतीने दुष्काळ जाहीर केला म्हणून आभाराचे बॅनर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोर्चाचे बॅनर आणि आभाराचे बॅनर आजूबाजूला लावण्यात आले आहे. एवढंच नाही तर, अब्दुल सत्तार आणि त्यांच्या मुलाच्या वतीने मोर्चाकाढून स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सत्तेत सोबत असलेले दोन पक्ष एकेमकांच्या विरोधात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अब्दुल सत्तारांच्या मुलाने काढला मोर्चा...
संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंत्री सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी धडक मोर्चा काढला आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याची सुरवात झाली. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघालेला हा मोर्चा तहसिल कार्यालयावर जाऊन धडकला.
भाजपकडून सरकारचे स्वागत करणारे बॅनर....
सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात सिल्लोडला वगळण्यात आल्याचा आरोप सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी केला आहे. मात्र, सिल्लोड तालुक्यातील 8 पैकी 7 महसूल मंडळात सरकारने कालच दुष्काळ जाहीर केले असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अब्दुल समीर यांचे दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीचे बॅनर लागले आहेत, त्याच्याच बाजूला भाजपने दुष्काळ जाहीर केल्याचे बॅनर लावले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
वडील सत्तेत मंत्री, पण मुलाने काढला सरकार विरोधातच मोर्चा; 'अजब आंदोलनाची गजब कहाणी'