(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक! संभाजीनगरचे स्वयंघोषित नेते करतायत उद्योजकांना ब्लॅकमेल
Chhatrapati Sambhaji Nagar News : उद्योजकांनी आपल्या तक्रारीचा पाढाच उद्योग मित्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासमोर वाचला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : बातमी उद्योग क्षेत्राची चिंता वाढवणारी आहे, कारण छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्योजकांना ठरावीक राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल केले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे याला खुद्द उद्योजकांनी वाचा फोडली असून आपल्या तक्रारीचा पाढाच उद्योग मित्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासमोर वाचला.
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक नगरीची ऑटो हब अशी ओळख आहे. स्कोडा, बजाज, व्हिडीओकॉन यासारख्या मोठ्या कंपन्या जिल्ह्यात आल्या आणि शहराचं रुपडं पालटले. या मोठ्या कंपन्यांच्या छताखाली अनेक छोटे-मोठे उद्योग देखील निर्माण झाले. कालांतराने फार्मा कंपन्यांनीही आपलं जाळं एमआयडीसीत पसरवलं आणि शहराच्या उद्योगाला भरभराटी मिळाली. यामुळेच आशिया खंडातील झपाट्याने वाढणार शहर अशी संभाजीनगर शहराची ओळख निर्माण झाली. मात्र याच उद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजक चिंताग्रस्त आहेत. त्याचं कारण ठरतंय राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित नेते. कारण अशा स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उद्योजकांनी आपल्या अडचणी सांगितल्या. ज्यात ठरावीक राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा मुद्दा उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला. तसेच या सर्व गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी देखील उद्योजकांनी केली आहे.
उद्योजकांच्या तक्रारी...
- उद्योजकांनी बेकायदा अतिक्रमण केल्याच्या खोट्या तक्रारी केल्या जातात.
- कारवाई करण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी निवेदन दिले जात आहे.
- कारखान्यासमोर अथवा एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली जाते.
- फायर सुरक्षा यंत्रणा आहे काय याबाबत अधिकार नसताना विचारणा केली जाते
- अनेकदा तक्रारी मागे घेण्यासाठी खंडणी मागितले जाते.
एकीकडे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत सरकारने संभाजीनगर जिल्ह्यात ऑरिक सिटीसारखा प्रकल्प उभारला. यासाठी नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. पण दुसरीकडे आहे त्या उद्योजकांना लागणारी सुरक्षित पुरवण्यात मात्र सरकार कमी पडताना पाहायला मिळतोय. त्यामुळे उद्योजकांच्या या तक्रारीची दखल घेणं गरजेचं आहे, अन्यथा याचे वाईट परिणाम उद्योग क्षेत्रावर झाल्यास नवल वाटू नयेत.
इतर महत्वाच्या बातम्या: