(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat : सत्ताधारी आमदाराचा ट्रॅक्टर चोरीला, संजय शिरसाट यांची ट्रॅक्टर-ट्रॉली चोरी करणाऱ्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान
Chhatrapati Sambhaji Nagar : शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ यांच्या तक्रारीवरून शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत राहणारे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राहत्या घराच्या परिसरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधून पाच लाख रुपये किंमतीची, शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली चोरून नेले आहे. चक्क सत्ताधारी आमदाराचाच ट्रॅक्टर चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाठ (वय 32 वर्ष, रा. बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीवरून शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धांत संजय शिरसाठ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास सातारा परिसरातील गट क्रमांक 92 मधील तंत्रनगर येथे त्यांच्या बहिणीच्या नावे असलेला लाल रंगाचे महिंद्रा ट्रॅक्टर (क्रमांक Mh-20-Fu-8926) कोणेतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. अंदाजे पाच लाख रुपये किमतीची ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेल्याचं तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाबूकस्वार यांच्याकडे देण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
चक्क आमदाराचाच ट्रॅक्टर चोरीला
शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात सतत चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध देखील घेतला जात आहे. मात्र चोरांनी थेट आमदार शिरसाट यांचाच ट्रॅक्टर चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. जर आमदारच सुरक्षित नसतील तर सर्व सामन्य लोकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आमदार शिरसाट यांचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे. त्यामुळे आता पोलीस चोरांना कसे आणि कधी पकडतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
खासदार फौजिया खान यांच्या घरातही झाली होती चोरी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली होती. फौजिया खान यांचे संभाजीनगर शहरातील एन-13 मधील चाऊस कॉलनीमध्ये घर असून, 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात चोरी केली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी प्रवेश केला. त्यानंतर घराच्या पाठीमागील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला होता. घरात प्रवेश केल्यावर घरातील जर्मनचे पाच जुने भांडे ज्यांची किमंत 3 हजार रुपये हे चोरून नेले होते. त्यामुळे याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खासदार फौजिया खान यांच्यानंतर आमदार शिरसाट यांच्या शेतात चोरी झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: