Mobile Sex Determation Diagnosis Center : चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह घरी पोहोचायचा
Maharashtra mobile sex determination diagnosis Center: याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून या डॉक्टरासह त्याच्या सोबत असणाऱ्या नर्सला ताब्यात घेतले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज परिसरात फिरते गर्भलिंग निदान (Maharashtra Mobile Sex Determination Diagnosis Center) चालवण्याच्या रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी (2 मे) रोजी भांडाफोड केला आहे. धक्कादायक म्हणजे यातील आरोपी डॉक्टर गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्य चक्क चारचाकी गाडीतून घेऊन फिरत होता. फोन केल्यावर तो थेट घरी येऊन गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून या डॉक्टरासह त्याच्यासोबत असणाऱ्या नर्सला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. तर डॉ. सुनील राजपूत (रा. टीव्ही सेंटर), पूजा भालेराव (रा सिल्लोड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या डॉक्टर आणि नर्सचे नावं आहेत.
गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार बंदी असताना अनेक ठिकाणी केवळ पैशांसाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे प्रकार आतापर्यंत अनेकदा कारवाईतून समोर आले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील या वर्षे अशा अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान वाळूज परिसरात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गर्भलिंग निदान चाचणी करणारे साहित्यासह एक चार चाकी वाहनही जप्त केले आहे. गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उजेडात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
वाळूज भागात डॉ. राजपूत हा फिरते गर्भलिंग निदान रॅकेट चालवत असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना दिली होती. ही माहिती मिळताच संबंधित डॉक्टरास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका महिलेस डॉ. राजपूत याच्याशी संपर्क करायला लावून गर्भलिंग निदान चाचणी करायची आहे, असे सांगितले. सुरुवातीला डॉ राजपूत याने विचार करत थोडा वेळ घेतला. खात्री पटल्यानंतर त्या महिलेस गर्भलिंग निदान चाचणी करण्यास होकार देत शुक्रवारी वाळूजला चाचणी करण्यास येतो. असे सांगितले.
अन् पोलिसांनी सापळा लावून घेतलं ताब्यात....
राजपूतने गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी होकार देताच पोलिसांनी गंगापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचासमक्ष वाळूज भागात सापळा रचला. गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी डॉ. राजपूत याने सोबत मदतनीस म्हणून पूजा भालेराव हिला सोबत घेऊन दुपारीच वाळूजला पोहोचला. काही वेळाने संबंधित महिलेस घेऊन डॉ. राजपूत व पूजा भालेराव हे दोघे वाळूजला त्या महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल मशिनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी सुरु केली. यावेळी बाजूलाच दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकासह वैद्यकीय पथकाने लगेच छापा मारुन डॉ. राजपूत आणि पूजा भालेराव या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत लपूनछपून गर्भलिंग निदान चाचण्या करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. पण थेट फिरते गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तर आरोग्य विभागाच्या कामकाजावर यावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
पती-पत्नी विकायचे गर्भपाताच्या गोळ्या, औषध प्रशासन विभागाने केली कारवाई