Chhatrapati Sambhajinagar : कुलूप लावून वॉचमन निघून गेला, चिमुकली वर्गातच अडकली; सात तासांनी नागरिकांनी केली सुटका
Chhatrapati Sambhajinagar : आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कुलूप तोडून चिमुकलीला बाहेर काढले. त्यानंतर संबंधित वॉचमनला निलंबित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने खिडकीजवळ येऊन रडायला सुरुवात केली. त्यानंतर आसपासच्या मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी कुलूप तोडून तिला बाहेर काढले. शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, उम्मेखैर मुजम्मिल असं मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण असून, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच संबंधित वॉचमनला निलंबित करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे.
शहरातील रोजाबाग येथील महापालिकेची शाळा सकाळच्या सत्रात भरते. त्यामुळे, नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता मुले शाळेत येतात आणि साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर घरी जातात. दरम्यान, नियमाप्रमाणे सोमवारी (25 सप्टेंबर) रोजी सकाळी शाळा भरली आणि दुपारी साडेबारा वाजता सुटली. शाळा सुटल्यावर मुलं निघून गेली. त्यामुळे काही वेळाने शाळेसाठी नियुक्त केलेला वॉचमन विठ्ठल बमने याने सर्व खोल्यांना कुलूप लावून निघून गेला. मात्र, पहिल्या वर्गात शिकणारी एक चिमुकली वर्गात तशीच राहून गेली. वर्गात कोणीच नसल्याचे लक्षात आल्यावर मुलीने दाराकडे धाव घेतली, पण ते बाहेरून बंद होते. त्यामुळे चिमुकलीने दार ठोठावला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या मुलीने रडायला सुरवात केली.
शाळेतून मुलीच्या रडण्याचे आवाज येत असल्याने आसपासच्या मुलांनी शाळेत धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांना एका बंद खोलीत मुलगी दिसली. काही वेळात परिसरातील नागरिकही जमा झाले. अखेर खोलीला लावलेले कुलूप तोडून चिमुकलीची सुटका करण्यात आली. तसेच मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, या सर्व घटनेनंतर शाळा प्रशासनाचा भोंगळपणा समोर आला असून, याची दाखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. तसेच संबंधित वॉचमनला निलंबित करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे.
वॉचमन नेहमी दारू प्राशन करून येतो?
या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची शाळा परिसरात गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी हातोड्याच्या साहाय्याने कुलूप तोडून बंद खोलीत असलेल्या मुलीची सुटका केली. शाळेत वॉचमनचे काम करणारा विठ्ठल बमने नेहमी दारू प्राशन करून असतो, असा आरोप काही तरुणांनी केला. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून संबंधित वॉचमनला निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI