(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय सांगता! जेव्हा मंत्री खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंगतीत येऊन बसतात; शिक्षकांची उडाली धांदल
Abdul Sattar : गावात विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मंत्री अब्दुल सत्तार अचानक जिल्हा परिषेदच्या शाळेत जाऊन धडकले.
छत्रपती संभाजीनगर : पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आज आपल्या मतदारसंघातील बाभूळगाव येथे विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी आले असतांना गावातील जि.प. शाळेला अचानक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची वेळ झाली होती. त्यामुळे, अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चविष्ट असतो का? यासाठी विद्यार्थ्यांसोबत मध्यान भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच येथील शालेय पोषण आहारा विषयी माहिती जाणून घेतली. मात्र, अचानक थेट मंत्रीच विद्यार्थ्यांच्या पंगतीत येऊन बसल्याने शिक्षकांची धांदल उडाली.
त्याचं झालं असं की, अब्दुल सत्तार आज आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, याच दौऱ्यात बाभूळगाव येथील काही विकास कामांचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे, गावकऱ्यांकडून कार्यक्रमाची सर्व तयारी करण्यात आली. ठरलेल्याप्रमाणे अब्दुल सत्तार गावात दाखल देखील झाले. सत्तार यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन देखील करण्यात आले. परंतु, कार्यक्रम संपल्यावर सत्तार हे पुढील दौऱ्यासाठी निघाले असतानाच, त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची मधली सुट्टी झाल्याचे लक्षात आले. अब्दुल सत्तार थेट शाळेत जाऊन धडकले. यावेळी विध्यार्थी मध्यान भोजनाचा आस्वाद घेत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे, सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवून सत्तार विद्यार्थ्यांसोबत पंगतीत जाऊन बसले आणि त्यांनी देखील शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शाळेत मिळणाऱ्या भोजनाबद्दल माहिती जाणून घेतली. पण, अचानक थेट मंत्री अब्दुल सत्तार विद्यार्थ्यांच्या पंगतीत येऊन बसल्याने शिक्षकांची धांदल उडाली. तर, हे सगळं पाहून उपस्थित गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा पहायला मिळाली.
शासनाच्या निकषाप्रमाणे ठरलेल्या दिवशी पोषण आहार दिला जातो का?, दिला जाणारा आहार वेळेवर दिला जातो का? ही सर्व माहिती अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांकडून उलगडून घेतली. तर, मंत्र्यांनी अचानक भेट देऊन प्रश्नांची सरबत्ती केल्याने शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली. पण, याचवेळी आपल्या सोबत मंत्री खिचडीचा आस्वाद घेत असल्याचा विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता. यावेळी अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनाही मंत्र्यांनी केलेल्या प्रश्नांची मनसोक्त उत्तरे दिली. तर, शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आपण मदत करणार असून, या माध्यमातून मला शाळेतील कामकाजाचा नियमित व्हिडीओ टाकण्याच्या सूचना अब्दुल सत्तार यांनी यावेळी शिक्षकांना दिल्या.
इतर महत्वाच्या बातम्या: