खैरेंनी औकात काढली, भुमरे म्हणाले लोकसभेत दाखवतो'; लोकसभा निवडणुकीवरून शिंदे-ठाकरे गटात वाद पेटला
Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Chandrakant Khaire VS Sandipan Bhumre: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) लोकसभा निवडणुकीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी याच मुद्यावरून पुन्हा एकदा एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीत मी उतरल्यास खैरे यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवतो असे भुमरे म्हणाले. तर डिपॉझिट जप्त करण्याची खैरेंची औकात नाही असे खैरे म्हणाले आहेत.
एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. तसेच याच मतदारसंघावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील दावा केला जात आहे. पण अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या जागेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे सद्या जिल्ह्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याच मुद्यावरून मंत्री भुमरे आणि खैरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले भुमरे?
दरम्यान खैरे यांच्यावर टीका करताना भुमरे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. विशेष म्हणजे यासाठी आमची देखील तयारी झाली आहे. कारण ही जागा शिवसेनेची असून, शिवसेनाच लढवणार आहे. मुख्यमंत्री जर म्हटले तर मी देखील उमेदवार राहिल, पण उमेदवार हा शिवसेनेचाच रिंगणात असेल. तसेच मला उमेदवारी दिली तर माझी देखील तयारी आहे. तर जेव्हा मी लोकसभा निवडणुकीत रिंगणात असेल, त्यावेळी खैरे यांनी देखील माझ्यासोबत रिंगणात उतरावे. खैरे सांगतात मी असा आहे, तसा आहे. तर 2024 मध्ये पाहू खैरे याचं काय होते. जर आम्ही दोघे आमने-सामने आल्यास खैरे याचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो असे भुमरे म्हणाले.
खैरे म्हणाले भुमरेंची औकात नाही....
दरम्यान भुमरे यांच्या आव्हानानंतर चंद्रकांत खैरे यांनी देखील उत्तर दिले आहे. "डिपॉझिट भुमरे यांची औकातच नाही. भुमरे यांना मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेलो होतो. मी पालकमंत्री असताना भुमरे आमदार होते. मी त्यांना खूप मदत केली. त्यानंतर देखील त्यांना मंत्री करण्यासाठी मी त्यांना मदत करत मंत्रीपद मिळवून दिली. पण ज्या व्यक्तीने त्यांना मोठं केलं, मंत्री केलं त्यांना ते विसरतात. तसेच भुमरे यांची डिपॉझिट जप्त करण्यासाठी मी तयार असल्याचे खैरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: