Chhatrapati Sambhaji Nagar : जमिनीच्या वादातून मुलानेच केली सावत्र आईची हत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Crime News : पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या सावत्र आईला बेदम मारहाण करून तिची हत्या (Murder) केल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर स्वतः विहिरित उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केला. मात्र परिसरतील नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वैजापूर तालुक्यातील आगरसायगाव येथे शनिवारी (1 जून) रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतवस्तीवर घडली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाई घमाजी जाधव (वय 48 वर्षे. रा. अगरसायगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. तर नानासाहेब घमाजी जाधव (वय 33 वर्षे, रा. अगरसायगाव) असे आरोपीचे नाव आहे.
वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र मुलाने आईचा खून केल्याचा खळबळ जनक प्रकार सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. नानासाहेब यांचा आपल्या सावत्र आई आशाबाई यांच्याशी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून नानासाहेब याने आज सकाळी साडेअकरा वाजता, विळ्याने आशाबाई यांच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. ज्यात आशाबाई या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी नानासाहेब याला ताब्यात घेतले. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
जमिनीचा वाद विकोपाला...
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नानासाहेब हा आशाबाई यांचा सावत्र मुलगा होता. दरम्यान त्यांच्यात जमनीवरून वाद होत होते. तर आज सकाळी पुन्हा दोघांमध्ये यावरून वाद सुरु झाला. या वादात सुरवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. पण हा वाद आणखीनच वाढत गेला. सावत्र आईचे शब्द नानासाहेबाच्या मनाला लागले आणि त्याला प्रचंड राग आला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने विळ्याने आशाबाई यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. जोरजोरात वार केल्याने आशाबाई यात गंभीर जखमी झाल्या. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नानासाहेबला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दरम्यान या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: