RSS Meeting: प्रचारकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल, राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या प्रचारक बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय
RSS Pracharak: राजस्थानमधील झुंझुनू येथे आरएसएसच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून प्रचारकांच्या जबाबदारीतही बदल करण्यात आला आहे.
Rajasthan RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची बैठक झुंझुनूच्या खेमी शक्ती मंदिर परिसरात झाली. कोरोनाच्या काळानंतर झालेल्या प्रांत प्रचारक बैठकीत संघटनात्मक कामांसोबतच आगामी योजना आणि उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तीन दिवसीय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, सहसरकार्यवाह डॉ.कृष्ण गोपाळ, डॉ.मनमोहन, वैद्य, आर.सी. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, सर्व कार्य विभाग प्रमुखांसह 45 प्रांत प्रचारकांची तीन दिवसीय बैठक झाली.
राजस्थानमधील झुंझुनू येथे आरएसएसच्या प्रांत प्रचारक बैठकीत झालेल्या निर्णयानंतर काही प्रचारकांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली कार्यालयाचा प्रभारी असलेले हरीश यांना उत्तर विभागाचे सह-प्रचारक बनवण्यात आले आहे. प्रेम कुमार यांना आरएसएसचे विशेष निमंत्रित सदस्य आणि आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीमध्ये जागरण पत्रिका आणि प्रकाशनमालाचे संरक्षक बनवण्यात आले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही प्रमुख राज्ये दक्षिण मध्य प्रदेशात येतात. नवीन बदलांनुसार, भरत कुमार यांना दक्षिण मध्य प्रदेशाचे सह-क्षेत्र प्रचारक, आदित्य यांना दक्षिण मध्य प्रदेशाचे प्रांत प्रचारक आणि जनार्दन यांना सह-प्रांत प्रचारक बनवण्यात आले आहे.
देशभरात एक लाख शाखांचे लक्ष्य
येत्या 2025 मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षासाठी सर्वसमावेशक विस्तार योजना तयार करण्यात आली आहे. 2024 पर्यंत देशभरातील एक लाख ठिकाणी शाखा उघडल्या जातील. संघाच्या कार्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा आणि सामाजिक प्रबोधनाबरोबरच देशात सामाजिक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, असा आरएसएसचा प्रयत्न आहे. या बैठकीत गतवर्षीचा आढावा आणि आगामी दोन वर्षांच्या कृती आराखड्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या सुनील आंबेकर यांनी माध्यमांना सांगितले.