Bhandara News : मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री निकृष्ट दर्जाची, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा भंडारा झेडपीचा ठराव
Bhandara Mid Day Meal : भंडाऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं आहे. अशा पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करुन त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव भंडारा जिल्हा परिषदने घेतला आहे.
Bhandara Mid Day Meal : शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सकस आहार पुरवठा करुन त्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. याकरता कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजनेच्या (Midday Meal Scheme) सामुग्रीचा पुरवठा करण्यात आला. मात्र, भंडाऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांसाठी पुरवठा केलेलं हे भोजन जनावरही खाऊ शकत नाही, अशा पद्धतीचं हे साहित्य असल्याने अशा पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करुन त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव भंडारा जिल्हा परिषदने (Bhandara ZP) घेतला आहे.
सॅम्पल दाखवताना उत्कृष्ट दर्जाची सामुग्री, कंत्राट पास झाल्यावर निकृष्ट दर्जाची सामुग्री
मध्यान्ह भोजन योजनेचा राज्य सरकारने मेन्यू तयार केलेला आहे. या मेन्यूनुसार चणे, वटाणा, मूग डाळ, मिरची पावडर, मसाला ही सामुग्री कंत्राटदाराने पुरवठा करावा, असा करार संबंधित कंत्राटदार आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केला आहे. कंत्राट मिळवण्यासाठी संबंधित कंत्राटदार सॅम्पल दाखवताना उत्कृष्ट दर्जाची सामुग्री दाखवतात. ज्यात तिखट, डाळ, काबुली चणे, मसाला आणि अन्य प्रकारची सामुग्रीचा समावेश असतो. मात्र, कंत्राट पास झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार स्वतःला अधिक आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने अत्यंत निकृष्ट दर्जाची सामुग्री पॅकिंग करुन ती पुरवठा केल्याचं समोर आली. यानंतर भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सामुग्रीची तपासणी केली असता हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
निकृष्ट सामुग्री पाठवणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करुन कारवाई करा : भंडारा जिल्हा परिषदेचा ठराव
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांना ज्या कंत्राटदाराने ही सामुग्री पुरवठा केली, त्याच्याकडेच विदर्भातील आणखी सात जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री पुरवठा करण्याचं कंत्राट आहे. भंडाऱ्यात जर अत्यंत निकृष्ट दर्जाची सामुग्री पोहोचत असेल तर अन्य जिल्ह्यात चांगली सामुग्री पोहोचली असेल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ठराव पारित केला असून जनावरही खाऊ शकणार नाही अशा पद्धतीचं मध्यान्ह भोजन योजनेची सामुग्री पाठवणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करुन त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव घेण्यात आला आहे.
उत्कृष्ट दर्जाच्या भोजन सामुग्रीचा पुरवठा होणार का?
शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. असं असलं तरी कंत्राटदाराच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या शालेय पोषण आहाराच्या सामुग्रीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळ मांडल्याचा जणू हा प्रकार राज्य सरकार खपवून घेणार का? कंत्राटदारावर कारवाई करुन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या भोजन सामुग्रीचा पुरवठा होणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.