इंद्रायणीसारखीच दुर्घटना घडण्याची भीती; वैनगंगा नदीवरील खचलेल्या पुलावरुन जीव मुठीत धरुन प्रवास
इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले आहेत.

भंडारा : पुणे जिल्ह्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील (River) पूल कोसळून काल मोठी दुर्घटना घडली. त्यानंतर, सरकारला जाग आली असून आता राज्यातील पुलांचे (Bridge) ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यात तशाचं दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. कारण, यंदा पाऊसमान भरपूर असून अनेक जिल्ह्यात नद्यांवरील पुल खचल्याचे किंवा धोकादायक स्थितीत असल्याचंही पाहायला मिळत आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही पुण्यासारख्याच दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळीचं लक्ष घातलं नाही आणि लोकांनीही सावधगिरी बाळगली नाही तर, इंद्रायणी नदीवरील घडलेल्या घटनेसारखी घटना घडू शकते. वर्षभरापूर्वी आलेल्या पुरात येथील कारधाच्या वैनगंगा नदीच्या पुलावरील लोखंडी कठळे वाहून गेलेत.
इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेत पुलावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीत कोसळून वाहून गेले आहेत. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 52 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले. त्यामध्ये 51 जण जखमी झाले आहेत. मात्र, सावधगिरी न बाळगल्यास याच दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यातील कारधा येथे 30 फूट खोल नदीवर असलेल्या या इंग्रजकालीन पुलाला आता 95 वर्षांचा कालावधी झालाय. त्यामुळं हा पूल दोन वर्षांपासून प्रशासनाच्या कागदोपत्री बंद असला तरी, लोकांकडून त्यांच्या सोयीचा आणि भंडारा शहराला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून आजही त्याचा दिवसरात्र वापर करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहरालगत वैनगंगा नदीवर कोट्यवधींचा खर्च करून मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आलीय. मात्र, तिथून असणारी वर्दळ आणि अपघाताचं प्रमाण लक्षात घेता नागरिक त्या मार्गावरून जीवघेणा प्रवास धोक्याचा समजून या जिर्णावस्थेतील पुलावरूनचं जीवघेणा प्रवास करत आहेत.
ग्रामीण भागातील मजूरवर्ग भंडाऱ्यात रोजगारासाठी येतात. तर, शहरातून ग्रामीण भागात जाणारे नोकरदारवर्ग याच मार्गाचा वापर करीत आहेत. नागरिक या पुलावरून जीवघेणा प्रवास का करतात, हे एबीपी माझानं जाणून घेतलं असता. कारधा येथून वैनगंगा नदीच्या नवीन पुलाला जोडणारा डायव्हर्शन तयार करण्यात आलं नसल्यामुळेच लहान आणि जीर्ण पुलाचा वापर प्रवासी, नागरिक करीत असल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.
पुलावरील सूचनाफलक अन् बॅरिकेटस गायब
काही महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीवरील कारधा नदीवरील पुल धोक्याचा असल्यानं बॅरिकेटिंग आणि सूचना फलक लावून बंद करण्यात आला होता. मात्र, आता हे बॅरिकेटिंग आणि सूचनाफलक येथे दिसून येत नाही. त्यामुळे याबाबत प्रशासनानेच आता खुलासा करणे योग्य आहे. हा पूल ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडं आहे, त्या अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते अधिकारी शासकीय कामाकरिता भंडारा शहराच्या बाहेर असल्यानं त्यांची प्रतिक्रिया किंवा पुलाबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचा
कुंडमळा दुर्घटनेची भीषणता दाखवणारा EXCLUSIVE फोटो, पुलावर नेमके किती पर्यटक होते?



















