भंडारा : येथील जांभोरा (jambhora) गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. साक्षगंधाच्या कार्यक्रमातील भाजीत पाल पडली होती. अनावधानाने ती भाजी ग्रामस्थांनी खाल्ल्याने तब्बल 51 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यामुळे भंडाऱ्यात (Bhandara News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भंडाऱ्याच्या जांभोरा गावातील एका मुलीचा विवाह जुळल्यानं साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या भाजीमध्ये पाल पडली. मात्र याबाबत कल्पना नसल्यानं ती गावकऱ्यांना जेवणात वाढण्यात आली.
जांभोरा गावात 51 जणांना अन्नातून विषबाधा
ही भाजी खाल्ल्यानं 51 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली. रात्री अनेकांची प्रकृती अत्यवस्थ असल्यानं दहा ते बारा ग्रामस्थांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, उर्वरित नागरिकांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर जांभोरा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात येत आहे.
पितृपक्षाच्या कार्यक्रमातील जेवणातून 60 जणांना विषबाधा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमातील जेवणातून 60 जणांना विषबाधा झाली होती. या सर्वांवर धारुर आणि अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. सध्या सगळीकडे पितृ पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील उंदरी येथे भागवत ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रम निमित्त संबंधित व कुटुंबातील व्यक्तीसाठी जेवणाचा कार्यक्रम दुपारच्या वेळेमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून संध्याकाळी 60 नागरिकांना उलटी, जुलाब आणि चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्या सर्वांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या