Weather Update : राज्यातील बहुतांश भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल (Heavy Rain) असा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या परतीच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हे शेतातील पिकांना बसला असून ऐन कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केलं आहे. तर या पावसाचा फटका महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यालाही बसताना दिसत आहे.
अमित शाहांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरही पावसाचे सावट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा सावंट असून हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. तर नाशिकमध्ये मुसळधार पावसालाही आता सुरुवात झाली आहे. परिणामी, दमदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तसेच अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र एकच धावपळ उडाली आहे.
रोहना नदीला पूर, बुलढाणा नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव , बुलढाणा , चिखली तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. दरम्यान, बुलढाणा - खामगाव - नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून गेल्या काही तासापासून वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचही मोठ नुकसान झाल आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती गोंदिया जिल्ह्याची देखील आहे. सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला होता. गोंदियातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सध्या कापणीला आलेल्या धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका
सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीकाचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. तर आगामी काळात असाच पाऊस सुरु राहिला तर शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडण्याची शक्यता अधिक बाळवली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तर अशीच काहीशी परिस्थिती बीडच्या परळी तालुक्यातली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तसेच मध्यरात्री झालेल्या पावसाने खरिपातील सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळीतील संगम येथे मध्यरात्री दमदार पाऊस झाला. याच पावसात काढणीला आलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेले आहे. मागील पंधरा दिवसात झालेल्या पावसात देखील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचेच पंचनामे अद्याप झाले नसताना आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर नवसंकट उभा ठाकले आहे. अशातच शेतकऱ्यांची मदार पूर्णतः राज्य सरकारच्या मदतीवर आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते आहे.
हे ही वाचा