जळगाव: पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवनिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील 70 विद्यार्थी व चार शिक्षकांना विषबाधा (Food Poisoning) झाली. त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे. 


शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवनिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भंडाऱ्यात डाळभात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता. सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली. विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व चार शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. उपचार नंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, संध्याकाळी पाचपासून रात्री नऊपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरु होते. पारोळा रुग्णालयात उपचार सुरु असून श्रुती कैलास बेलेकर, ऐश्वर्य जगन महाले या दोन विद्यार्थिनींची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने त्यांना धुळ्यात हलवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती. 


आणखी वाचा: 


आठवडी बाजारात खाल्लेली पाणीपुरी बाधली; उलट्या, जुलाब, पोटदुखीनं अनेकजण त्रस्त, 80 हून अधिक जणांना विषबाधा


धक्कादायक! जि.प शाळेतील 50हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा; मळमळ उलट्या, विद्यार्थी तापाने फणफणले