Beed: आरोग्य दूतांची फरपट, 102 अँबुलन्स चालकांचा सात महिन्यापासून पगार रखडला
Beed News : कोरोनाच्या काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारे अँबुलन्स चालक आता मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या सहा महिन्यापासून वेतन रखडलेल्या या अँबुलन्स चालकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं आहे.

Beed News : कोरोनाच्या काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणारे अँबुलन्स चालक आता मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या सहा महिन्यापासून वेतन रखडलेल्या या अँबुलन्स चालकांनी आता काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोग्य दूत म्हणून सन्मान करण्यात आलेल्या अँबुलन्स चालकांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे. हे आंदोलक अँबुलन्स चालक बीडमधील आहे.
बीड मधील 102 हेल्पलाइन असलेल्या रुग्णवाहिका चालक सय्यद मोहम्मद हे गेल्या 11 वर्षांपासून रुग्णवाहिका चालवत आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यापासून त्यांना एकही रुपयांच वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. ही व्यथा एकट्या सय्यद मोहम्मद यांची नाही तर बीड जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात 102 क्रमांक हेल्पलाईन असलेल्या रुग्णवाहिका चालकांची आहे. त्यांनी रुग्णवाहिका बंद ठेवल्या आहेत. कारण गेल्या सहा महिन्यापासून एकाही चालकाला एक रुपयाचाही पगार मिळालेला नाही. उलट आपल्या पगारीची मागणी करणाऱ्या चालकांना कामावरून काढण्याच्या धमक्या कंत्राटदाराकडून मिळत आहेत.
पूर्वी याच रुग्णवाहिकांच कंत्राट बीव्हीजी ग्रुपकडे होतं. तेव्हा या चालकांना पगार वेळेत मिळायचा, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी या रुग्णवाहिकांचे कंत्राट मुंबईच्या मे ऍडव्हान्स एफ एम एस अँड सिक्युरिटी या कंपनीकडे गेलं, तेव्हापासून या चालकांना पगारच मिळालेला नाही. चालकांना जर पगार हवा असेल तर त्यातील 20 टक्के रक्कम ही कंपनीला द्यावी लागेल, अशी अट या कंपनीने घातल्याचा आरोप चालकांनी केला आहे. त्यामुळे चालकांनी कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून या रुग्णवाहिका एका जागेवर उभ्या असल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत असून यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सांनी राज्य सरकारला एक पत्र लिहून संबंधित कंपनीने या चालकांचे वेतन तात्काळ आदा न केल्यास कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याच आरोग्य दूतांच्या हाती खऱ्या अर्थाने मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांचे आयुष्य असते. अपघातापासून ते अगदी छोट्या-मोठ्या कारणासाठी सुद्धा हेच अँबुलन्स चालक आपल्या जीवाची पर्वा न करता ड्युटी बजावत असतात. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा पगार सुद्धा त्यांना दिला जात नसेल, तर मग याला जबाबदार कोण याचा विचार नक्कीच व्हायला हवा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
