अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसेकडून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
Ajit Pawar Sabha: अजित पवारांच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
MNS opposition to Ajit Pawar Sabha: शरद पवारांची (Sharad Pawar) बीड (Beed) जिल्ह्यात सभा झाल्यावर आता अजित पवारांची (Ajit Pawar) 27 ऑगस्ट रोजी उत्तर सभा होणार आहे. यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी देखील करण्यात येत आहे. मात्र, आता याच सभेत अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 27 ऑगस्टपर्यंत कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करण्यात यावी, अन्यथा अजित पवारांच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करण्यात यावी या मागणीसाठी बीडच्या अंबाजोगाईमध्ये मनसेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आलं. राज्याचे कृषीमंत्री हे बीड जिल्ह्यातलेच असून, तरीदेखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला. तर, 27 ऑगस्टपूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत जाहीर न झाल्यास, अजित पवारांच्या सभेत घुसून काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने उसंत दिल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करण्यात यावी, त्याचबरोबर पिक विमा देखील मंजूर करण्यात यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी देखील केली. तसेच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अजित पवारांच्या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचे म्हटले आहे.
अजित पवारांच्या घोषणांकडे लक्ष...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 27 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यात सभा घेणार आहे. विशेष म्हणजे मागील 20 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा खंड असल्याने पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी प्रकल्प कोरडेठाक पडल्याने आगामी काळात पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे आता अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असतांना बीड आणि मराठवाड्यासाठी काही घोषणा किंवा मदत जाहीर करणार का? हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar VS Ajit Pawar: अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा होणारच, धनंजय मुंडेंची माहिती