Marathwada Rain Update: भंडारा, परभणी, बीडमध्ये मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार, 3 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Marathwada Rain Update: बीडमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, माजलगावात देखील धोधो बरसला तर परळी,अंबाजोगाई परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळाली.

पुणे: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. अनेक हेक्टरवरील पीक सुकले आहे. अशातच बीडमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. बीड (Beed Rain) जिल्ह्यात पंधरा दिवस दडी मारल्यानंतर बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावण्याचे पाहायला मिळाले आहेत. रात्री माजलगाव परिसरात पाऊस धो धो बरसत होता. यामुळे काही शेतात पाणी देखील जमल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर परळी आणि अंबाजोगाई परिसरात देखील रात्रभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरिपाच्या पिकाला जीवदान मिळालं आहे. परळी परिसरातील शेतकऱ्यांना गेले दीड महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा होती. आता या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (Heavy Rain)
पर्यायी पूल वाहून गेल्याने सिरसाळा-पोहनेर वाहतूक ठप्प
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे काल (बुधवारी, ता-16) रात्री झालेल्या पावसामुळे रामेवाडी - पोहनेर मार्गावर असलेला पर्यायी फुल वाहून गेल्याने सिरसाळा ते पोहनेर दरम्यान असलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रात्री पडलेल्या पावसामुळे या सरस्वती व गुनवरा अशा दोन्ही नद्यांना पाणी आले. सरस्वती नदीवरील असलेल्या पुलाचे काम सुरू असल्याने बाजूला पर्यायी पूल उभारण्यात आला होता, मात्र नदीला पाणी आल्याने हा पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्याने सिरसाळा पोहनेर मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या पुलाचे काम संथगतीने होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात पहाटे जोरदार पाऊस
परभणी जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची परिस्थिती गंभीर झाली असतानाच वरूण राजाने परभणीकरांची आर्त हाक ऐकली आज पहाटे परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्याला पाणी आले आहे. सेलू शहरातील देवुळगाव गात येथील कसुरा नदीलाही पाणी आले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेलू शहरातील सेलू शहरातील तेली गल्ली, अरब गल्ली, नाला रोड परिसरात नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले असून अन्न धान्य व संसार उपयोगी साहित्यचे या पावसात नुकसान झाले आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी शेतात पाणीही साचले आहे.
आज 3 जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट
काल रात्री बीड, परळी,भंडारा याठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर आज 17 जुलै रोजी मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परभणी आणि बीड या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर जालना आणि हिंगोलीत देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
























