Manoj Jarange VIDEO : यांची एकदा जिरवलीय, पुन्हा जिरवणार; बीडमध्ये मराठ्यांना विरोध करणाऱ्यांना पाडा, जरांगेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
Manoj Jarange Beed Speech : आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना आहे, कारण मराठा आरक्षणाला विरोध फक्त त्यांच्यामुळेच आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
बीड : मला अडाणी म्हणणाऱ्या छगन भुजबळांना कसा खुट्टा ठोकलाय हे त्यांना माहिती आहे, गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर येत्या विधानसभेत पुन्हा जिरवणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता, आता त्यांनी त्यांचा शब्द पाळावा असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं. बीडमध्ये जर यापुढे कुणी मराठा समाजाला विरोध केलाच तर त्याला त्याची जागा दाखवा, त्याला निवडणुकीत पाडा असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. ते बीडमधील शांतता रॅलीमध्ये (Manoj Jarange Beed Speech) बोलत होते.
मनोज जरांगे यांच्या भाषणातील दहा मुद्दे
1. आता जर आरक्षण नाही मिळालं तर पुढच्या 20-25 पिढ्या वाया जातील. आमच्या वेदना तुम्हाला समजणार नाहीत, आत्महत्या केलेल्या घरात जाऊन एकदा बघा. मरण काय असतं आणि घरावर काय संकट असतं हे आम्ही पाहिलंय. तुम्ही फक्त मराठ्यांची चेष्ठा केलीय.
2. जर ओबीसी नेत्यांना त्यांच्या जातीचा गर्व असेल तर मलाही माझ्या जातीचा गर्व आहे. कुणावर जर अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नका, वेळ सगळ्यावर येते. गरीबांनी गरीबांना साथ द्यावी, श्रीमंत मराठे आपल्या मदतीला येणार नाहीत.
3. यांना त्यांच्या जातीची मस्ती आहे, त्यांची लोकसभेला जिरवलीय, विधानसभेलाही पुन्हा एकदा जिरवायची. मराठ्यांचं नुकसान करणाऱ्यांना माफ करायचं नाही. मराठ्यांना विरोध करणारा मराठा असला तरी त्याला विरोध करायचा, त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही.
4. सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही तर मी नाव घेऊन सांगणार, यांना पाडा. आपण कुणीही उमेदवार देऊ, त्याला साथ द्यायची. मतदान 100 टक्के करायचं.
4. आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना आहे. कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला. बाकी कुणाला विरोध नाही. मराठ्यांच्या नोंदीसुद्धा रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. त्यांना साथ द्यायची नाही, त्यांना पाडायचंच. धनगर समाजाला मराठा आरक्षणामुळे कोणताही धोका नाही. फक्त छगन भुजबळ सांगतात म्हणून यांचे नेते आपल्याला विरोध करतात.
5. सरकारच्या बाजूने जाऊन वाटोळे करू नका. निवडणुकीत हार जीत होत असते. एकदा पराभव झाल्यावर माझ्या समाजाला तुम्ही जातीयवादी ठरवताय. मराठा कधीही जातीयवादी नव्हता, हे ओबीसी नेते सगळे एकत्र झाले.
6. आपल्या ठरलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीची तातडीने अंमलबजावणी करा. सुरूवातीला ओबीसींच्या यादीत फक्त 180 जाती होत्या, नंतर त्यामध्ये पोटजाती म्हणून 450 च्या वर जाती वाढल्या. मग कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणुन त्यामध्ये का समावेश करत नाही.
7. आमचीही स्वप्न आहेत, आम्हालाही आरक्षण हवंय. कुणाला काय डाव टाकायचे ते टाकू द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही काय नवीन मागत नाही, जे वाशीमध्ये ठरलं होतं तेच द्या. सगेसोयऱ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करा
8. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. महाविकास आणि महायुतीवाले एकच आहेत असं दिसतंय. महाविकास वाले बैठकीला गेले नाहीत म्हणून महायुतीवाल्यांनी आरक्षणावर निर्णय घेतला नाही. त्यांना कोण अडवलं होतं?
9. जातीय दंगली झाल्या पाहिजेत अशी सरकारची इच्छा आहे. सरकारला भुजबळांच्या माध्यमातून जातीय दंगली घडवायच्या आहेत.
10. टेम्पो रिक्षावर असलेल्या मराठ्यांना वाटतं माझा मुलगा नोकरी करावा, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही का? शिंदेसाहेब तुम्हालाही विचारतोय, आमचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात? आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा बांधवांचा एकदा उंबरा ओलांडला, तुम्हाला काळोख आणि काळोखच दिसेल. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावं, यासाठी मुलांनी, बापांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आया-बहिणीचं कुंकू पुसलंय. घरातला माणूस गेला, आरक्षणाने घात केला, उभा संसार जाळात होरपळतोय.