Beed: 'तुम्ही आमची जिरवली, आता आधी कॅमेरे बंद करा; इंदुरीकर कॅमेऱ्यावरून भडकले अन् धनंजय मुंडेंनी...
Aurangabad : शेवटी धनंजय मुंडे यांनाच मध्यस्थी करून इंदुरीकर महाराज यांची समजूत काढावी लागली.
Indurikar Maharaj: परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी कॅमेऱ्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. समोर असलेले कॅमेरे काढल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी धनंजय मुंडे यांनाच मध्यस्थी करून इंदुरीकर महाराज यांची समजूत काढावी लागली.
धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या नात प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव सोहळ्यात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरू झालं यावेळी अभंगाची चाल सुरू असताना इंदुरीकर महाराज यांच्या आजूबाजूला आणि समोर असलेले कॅमेरे काढण्यासाठी त्यांनी कॅमेरामनला दम भरला. तेवढ्यात धनंजय मुंडे यांचा एक कार्यकर्ता त्यांच्याजवळ गेला आणि त्यानं आपण हे सगळं फेसबुक आणि युट्युबला लाईव्ह दाखवत आहोत असं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदुरीकर महाराज ऐकायला तयार नव्हते आणि मग प्रेक्षकात बसलेल्या धनंजय मुंडे यांनी माईक हाती घेतला आणि इंदुरीकर महाराज यांची समजूत काढली.
जिरवली तुम्ही आमची..
यावेळी कॅमेरा काढा असे सांगतांना इंदुरीकर म्हणाले की, 'उतर खाली..तो कॅमेरा काढून टाक.. जिरवली तुम्ही आमची', दोन तासांचा पूर्ण कीर्तन दाखवलं तर काही हरकत नाही. पण एकडचं एक वाक्य घेणार तिकडच एक वाक्य घेणार आणि दुसऱ्याची इज्जत घालून टाकणार. टीआरपी वाढवणार हे व्यावसायिक मंडळ आहे. टीआरपीसाठी काहीही करतील. याचे सर्वात जास्त फळ मी भोगले असून, अजूनही भोगत आहे. त्यामुळे काही क्लिप पडली, बातमी झाली तर याला तू जवाबदार राहशील, असेही इंदुरीकर आयोजकांना म्हणाले.
यामुळे नकोच ते कॅमेरे...
इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मात्र मधल्या काळात त्यांच्या कीर्तनाचे वापर अनेकजण विनोदी आणि टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी करतात. त्यामुळे इंदुरीकर महाराज प्रचंड ट्रोल होतात. तर त्यांच्या एका कीर्तनात बोलतांना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला असून, प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.त्यामुळे इंदुरीकर महाराज हे नेहमी माध्यमांच्या कॅमेरापासून दोन हात लांब राहणे पंसद करतात.