बीडच्या पिंगळेनगर भागातील शिक्षकानं संपवलं जीवन, कारण अस्पष्ट
Beed News : बीड शहरातील धानोरा रोडवरील पिंगळेनगर भागात एका शिक्षकाने (Teacher) आत्महत्या केल्याची घटना घडली.
Beed News : पतसंस्थेकडून वसुलीसाठी तगादा सुरू असल्यानं बीडच्या (Beed) एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाचं, आता आणखी एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. बीड शहरातील धानोरा रोडवरील पिंगळेनगर भागात एका शिक्षकाने (Teacher) घराच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. पांडुरंग काळबा भुतपल्ले (वय 55 वर्षे, रा. पिंगळेनगर, धानोरा रोड, बीड) असे मयत शिक्षकाचे नाव असून, 18 फेब्रुवारीला ही घटना पहाटे घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग भुतपल्ले हे शहरातील चंपावती शाळेत कार्यरत होते. दरम्यान नेहमीप्रमाणे जेवण करून,17 फेब्रुवारी रोजी भुतपल्ले झोपी गेले. मात्र 18 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच ते सहावाजेदरम्यान पांडुरंग भुतपल्ले यांनी घराच्या खिडकीला बाहेरून दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी सहा वाजता पत्नीला पती घरात दिसेनात म्हणून शोध घेतला असता घटना उघडकीस आली.
दरम्यान शेजारच्या मदतीनं भुतपल्ले यांना फासावरून उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान याची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे हवालदार संजय राठोड, अंमलदार भागवत घोडके यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दिनेश पांडुरंग भुतपल्ले याच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास अंमलदार भागवत घोटके करत आहेत.
कारण अस्पष्टचं!
शहरातील चंपावती शाळेत कार्यरत असलेले पांडुरंग भुतपल्ले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने मित्रमंडळीसह कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. रात्री झोपी गेलेल्या भुतपल्ले यांनी पहाटे उठून कुणाला काहीही न सांगता गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही अस्पष्टचं आहे. पोलिसांनी याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
पतसंस्थेकडून नोटीस मिळताच शिक्षकाची आत्महत्या
पांडुरंग भुतपल्ले यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील आणखी एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बीडच्या धारूर तालुक्यातील दहिफळ केंद्रांतर्गत असलेल्या कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक नितीन लक्ष्मण पाटोळे (रा. आसरडोह, धारूर) यांनी आत्महत्या केली होती. कोरोना काळात हप्ते थकले होते, तेव्हापासून सतत पतसंस्थेकडून वसुलीसाठी तगादा सुरू असल्यानं या सर्व परिस्थितीला कंटाळून नितीन पाटोळे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Crime : नाशिकच्या पंचवटीत बाप लेकाने गळफास घेत संपवल जीवन