बीडमध्ये पडळकरांचा पुतळा जाळला, भाजपमधून हकालपट्टी करण्याचीही मागणी; अजित पवार समर्थक आक्रमक
Beed News : भाजपने तात्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. दरम्यान, पडळकर यांच्या याच वक्तव्यावरून बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तसेच, भाजप आमचा मित्र पक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तसेच, भाजपने तात्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
यापूर्वी देखील गोपीचंद पडळकर यांनी अनेक नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहेत. तर, अजित पवार यांच्या बद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आपली मर्यादा राखून बोललं पाहिजे. आमच्या नेत्याबद्दल जर अशी पोरकट वक्तव्य केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडे देखील याचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून, गोपीचंद पडळकर यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर, 'अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे' अशी टीका पडळकर यांनी केली होती.
पडळकर दिसेल तिथे चोप देणार...
आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टिकेनंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील कार्यकर्त्यांनी देखील असेच रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील अजित पवारांचे समर्थक यांनी पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटने फाटा येथे आंदोलन केले. तसेच पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली.
रोहित पवारांचीही टीका...
अजित पवारांवर वादग्रस्त टीका करणाऱ्या पडळकर यांच्यावर रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे. “राष्ट्रीय राजकारणातील आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई, उपमुख्यमंत्री अजितदादा या नेत्यांवर बोलताना काही लोकप्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक पातळी सोडून बोलतात. उगाच गरळ ओकून वातावरण खराब करणाऱ्या अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांनी समज द्यायला हवी, अन्यथा टीका करण्यासाठीच अशा वाचाळवीरांना आमदारकी दिली हे जाहीर करावं. कुठल्याही पक्षाचे नेते असोत त्यांच्यावर टीका टिप्पणी करताना सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का बसणार याची काळजी घायलाच हवी, असे रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: