Market Committee Election : मराठवाड्यातील संभाजीनगर, बीडसह जालना जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला
Market Committee Election: अनेक ठिकाणी महत्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Market Committee Election: मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहे. 28 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्थानिक राजकारणाचे गणित जुळताना पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी महत्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महत्वाचे नेते स्वतः मैदानात उतरून प्रचार करत आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) कृषी उत्पन्न बाजार समितीसह फुलंब्री, पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड अशा एकूण 7 बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर या सातही बाजार समितीत आता 378 उमेदवार रिंगणात उरले आहे. ज्यात सर्वाधिक 86 उमेदवार कन्नड बाजार समितीत आपले नशीब आजमावत आहेत. तर सर्वांत कमी 38 उमेदवार पैठणमध्ये रिंगणात आहेत. सोबतच फुलंब्री 42, लासूर स्टेशन 58, वैजापूर 56, छत्रपती संभाजीनगर 47, आणि गंगापूर बाजार समितीमध्ये 51 उमेदवार रिंगणात आहेत.
बीड जिल्ह्यातील (Beed District) नऊ बाजार समित्यांच्या 162 संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. त्यामुळे आता 8 बाजार समित्यांची निवडणूक येत्या 28 व 30 एप्रिल रोजी होत असून, 22 हजार 562 मतदार बाजार समित्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. तर बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, परळी बाजार समिती, अंबाजोगाई बाजार समिती, पाटोदा बाजार समिती, केज बाजार समिती यांच्या निवडणूका पार पडणार आहे. धक्कादायक म्हणजे बीड जिल्ह्यातील केज मध्ये होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधीपक्षाकडून मतदारांचा अपहरण झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी केला आहे. याच संदर्भात त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
जालना जिल्ह्यातील (Jalna District) एकूण पाच बाजार समितसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी विविध मतदार संघांतून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या 511 उमेदवारांपैकी 308 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता 203 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. तर जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, आष्टी, परतूर, मंठा या पाच बाजार समित्यांसाठी निवडणूक होते आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: