Pankaja Munde: आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, पेढ्यांनी तुला, पंकजा म्हणाल्या, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही
Beed News: पंकजा मुंडे यांचा नुकताच विधानपरिषद निवडणुकीत विजय झाला होता. तब्बल पाच वर्षांनी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत. फक्त एक वर्ष एकजूट दाखवा.
बीड: विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे या सोमवारी पहिल्यांदाच भगवानगडावर आल्या होत्या. यावेळी भगवानगडावर (Beed News) समर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यासोबत त्यांची पेढ्यांनी तुला करण्यात आली. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावेळी आपल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, माझं आणि तुमचे नाते हे भगवान बाबा आणि माझे जे नाते आहे, तसेच असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मी आज तुम्हाला फक्त भगवान बाबांसाठी फुले आणायला सांगितली होती. तुम्ही माझ्याविषयी जे प्रेम दाखवत आहात, त्याला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही. मी मुंडे साहेबांनी वचन दिले होते, मी थकणार नाही, रुकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही. तुम्हाला वाटतंय की, फार मोठे युद्ध जिंकले आहे. पण मोठी लढाई आणखी बाकी आहे. माझ्या मंचासमोर माणसे नसावेत तो दिवस मला पाहायला मिळू नये. विधानपरिषदेची आमदारकी हा माझ्यासाठी सन्मान आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
अहंकाराचे भांडण सोडा, एकजूट व्हा: पंकजा मुंडे
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले. अहंकाराचे, पदाचे भांडण सोडा आणि एकजूट व्हा. एक वर्ष एकजुटीने घ्या. बीड जिल्ह्याने इतिहास घडवला आहे. मला तुमच्याकडूनही वचन हवे आहे. तुम्ही एकजूट राहण्याचे वचन द्या. काय करायचं आणि काय करायचं नाही याच भान ठेवा. आपल्याला काही कमी पडणार नाही, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना दिला.
विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय
तब्बल पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा आणि विधानपरिषदेची प्रत्येकी निवडणूक आली की, भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची चर्चा व्हायची. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन कधीच झाले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली, पण मराठा फॅक्टरने त्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड हताश झाले होते. या सर्वांना पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयाने नवी उभारी मिळाली आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे.
आणखी वाचा