Beed News : वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट, रणजीत कासलेच्या खळबळजनक दाव्यानंतर बीडच्या कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली
Beed News : वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जात असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला होता.

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जात असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला होता. कराडसाठी तुरुंगात विशेष चहा आणि चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते. इतकंच नव्हे, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावाही कासलेने केला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्यासह देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे चर्चेत आले होते. आता कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली. आता कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केलेल्या आरोपानंतर तत्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नेमका काय म्हणाला होता रणजीत कासले?
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरू ठेवले आहे. शनिवारी (२५ मे) रणजित कासले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत त्याने म्हटले होते की, कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो, तसेच त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते. इतकंच नाही, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावा त्याने केला आहे.
त्याचबरोबर, इतर कैद्यांना केवळ पांघरण्यासाठी कपडे पुरवले जात असताना, कराडला एक नव्हे तर तब्बल सहा ब्लँकेट दिले गेले असून, त्याचा वापर तो गादीसारखा करतो. कँटीन खरेदीसाठी इतर कैद्यांवर कडक निर्बंध असतानाही कराडकडून स्वतंत्रपणे 10 हजार आणि इतर कैद्यांच्या नावावरून आणखी 10 ते 15 हजारांची खरेदी होत असल्याचा आरोपही त्याने व्हिडीओत केला आहे.
आणखी वाचा























