बीड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा उपस्थित झाला आणि राज्यभरात एकच वणवा पेटला. यामध्ये सगळ्यात जास्त झळ पोहचली ती बीड (Beed) जिल्ह्याला. बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर बीडमध्ये अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी करण्यात आली. पण आता ही संचारबंदी शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु बीडमध्ये जमावबंदी कायम राहणार आहे. तसेच बीडमधील इंटरनेट सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. 


मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा दर्शवण्यात आला. पण हा पाठिंबा देत असतानाच राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक देखील झाले. खासदार आणि आमदारांच्या घराच्या परिसरात जाळपोळ करुन आंदोलकांनी निषेध केला. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केला आणि बीडमध्ये एकच खळबळ माजली. त्यानंतर आंदोलकांनी त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या घरावर देखील हल्ला केला. त्यामुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आला. 


म्हणून दिले संचारबंदीचे निर्देश


बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनांमुळे संचारबंदी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले. बीड शहर तसेच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये हे संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. बीडमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. 


आमदार संदीप शिंदे यांचे घर आणि कार्यालय पेटवलं


बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या 'या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने  क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली. 


आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.


माजलगाव नगरपरिषद पेटवून दिली


बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर जमावाने थेट माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडली. 


हेही वाचा : 


Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली