Mohammed Siraj cried in Lords : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर अखेर भारताचा पराभव झाला. पण ही केवळ एक हार नव्हती, तर जडेजा, बुमराह आणि सिराज यांच्यातील जिगर, जिद्दची कहाणी होती. शेवटच्या क्षणापर्यंत टीम इंडियाने विजयासाठी झुंज दिली. पण शेवटी इंग्लंडने 22 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 अशी आपल्या बाजूने झुकवली. दहाव्या विकेटसाठी जडेजा आणि सिराज क्रीजवर उभे होते. सामना अक्षरशः दोलायमान होता, कधी भारताच्या बाजूने, कधी इंग्लंडच्या. पण शेवटच्या क्षणांपर्यंत भारतीय फॅन्सच्या मनात आशेचा किरण जिवंत होता.

बेन स्टोक्सने सर्वच शक्य त्या युक्त्या आजमावल्या होत्या. पण भारतीय शेवटची जोडी तग धरून होती. अखेर त्याने शोएब बशीरकडे चेंडू सोपवला. समोर होता जडेजा त्याने दोन चेंडू खेळले, पण तिसऱ्यावर एक धाव घेतली आणि स्ट्राइक दिला सिराजला. सिराजने पुढचा चेंडू सुरक्षीतपणे खेळला. पण पाचव्या चेंडूवर बशीरची फिरकी सिराजला चुकली आणि चेंडू स्टंपवर लागला. त्यावेळी लॉर्ड्स जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलं.

सिराज त्या क्षणी जागेवरच थांबला. हातात बॅट, मान खाली, ते पिचवर बसला. त्यांचे भाव पाहून असं वाटत होतं की हे असं का झालं? फक्त 22 धावा आपण जिंकू शकलो असतो. त्या भावनिक क्षणी इंग्लंडचे खेळाडू हॅरी ब्रूक आणि जो रूट त्याच्या जवळ आले. त्यांनी माणुसकी दाखवत सिराजला सावरलं, त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा दिला.

सिराजने 30 चेंडूत 4 धावा करत जडेजासोबत 17 धावांची शेवटची भागीदारी केली. जडेजा मात्र 61 धावांवर नाबाद राहिला. पण विजय 22 धावांनी निसटला.  लॉर्ड्सवरील विजयासह इंग्लंडने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. चौथा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.

हे ही वाचा - 

Eng vs Ind 3rd Test : ...म्हणून आम्ही हरलो! लॉर्ड्स कसोटीत हरल्यानंतर शुभमन गिलने कोणावर फोडले पराभवाचे खापर? बुमराहबद्दल दिली अपडेट