मुंबई :  मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (Central Railway Main Line) आता आणखी 10 एसी लोकल धावणार आहेत. या एसी लोकल (AC Local) नॉन एसी लोकलची (Non AC Local) जागा घेणार आहेत. त्यामुळे नॉन एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे. तर, एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर या नव्या एसी लोकल 6 नोव्हेंबर रोजीपासून धावणार आहेत.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे 6 नोव्हेंबर 2023 पासून सामान्य (नॉन-एसी) सेवा बदलून आणखी 10 वातानुकूलित लोकल सेवा सुरू करणार आहे.  त्यामुळे वातानुकूलित लोकल सेवेची एकूण संख्या दररोज 66 इतकी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी सेवांची संख्या 1810 राहणार आहे. या 10 सेवांपैकी एक एसी लोकलही सकाळी आणि एक संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. या वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावणार आहे.  रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी या एसी लोकल धावणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. 


नवीन 10 एसी लोकलचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : 


-  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल  - कल्याण येथून सकाळी 7.16 वाजता सुटेल आणि 8.45 वाजता पोहोचेल.
- कल्याण धिमी लोकल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 8.49 वाजता सुटेल आणि 10.18 वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल - कल्याण येथून 10.25 वाजता सुटेल आणि 11.54 वाजता पोहोचेल.
- अंबरनाथ धिमी लोकल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 11.58 वाजता सुटेल आणि 13.44  वाजता पोहोचेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल - अंबरनाथ येथून दुपारी 2 वाजता सुटेल आणि दुपारी 3.47 वाजता पोहोचेल.
- डोंबिवली धिमी लोकल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सांयकाळी 4.01 वाजता सुटेल आणि सायंकाळी 5.20 वाजता पोहोचेल.
- परळ धिमी लोकल - डोंबिवली येथून सायंकाळी 5.32 वाजता सुटेल आणि सायंकाळी 6.38 वाजता पोहोचेल.
- कल्याण धिमी लोकल - परळ येथून सायंकाळी 6.40  वाजता सुटेल आणि 7.54 वाजता पोहोचेल.
- परळ धिमी लोकल - कल्याण येथून रात्री 8.10 वाजता सुटेल आणि रात्री 9.25 वाजता पोहोचेल.
- कल्याण धिमी लोकल - परळ येथून रात्री 9.39 वाजता सुटेल आणि रात्री 10.53 वाजता पोहोचेल.



एसी लोकल प्रवाशांचे आंदोलन 


मागील वर्षी बदलापूर, कळवा येथून मध्य रेल्वेने साध्या लोकलच्या ऐवजी पुन्हा एसी लोकल सुरू केली होती. त्यावेळी प्रवाशांनी याला विरोध केला होता. कळवा स्थानकात प्रवाशांनी आंदोलन छेडले होते. स्थानिकांच्या रोषानंतर अखेर मध्य रेल्वेने माघार घेत फेऱ्या रद्द केल्या होत्या.