सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींना सोमवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर करता न आल्याने ते पोलिसांच्या ताब्यातच राहिले. त्यामुळे त्यांच्यावर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडले जाणार की गंभीर गुन्हे नोंद होणार याचा निर्णय मंगळवारी घेतला जाणार आहे. या प्रकरणी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई फेकण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना ताब्यात घेतलं. दाखल गुन्ह्यातील सर्व कलमे ही जामीनपात्र असल्याने त्यांना सोमवारी सोलापूरच्या पोलीस अधीक्षकसमोर प्रतिबंधत्मक कारवाईसाठी हजर करण्यात येणार होते. मात्र रात्रीपर्यंत या आरोपींना पोलीस अधीक्षकसमोर हजर करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना मंगळवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना केवळ प्रतिबंधत्मक कारवाई करून सोडले जाणार की त्यांच्यावर विरोधात गंभीर कलमनव्ये गुन्हा दाखल होणार हे पाहणे महत्वाचे
गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव?
या प्रकरणी आपली हत्या करण्याचा आरोपींचा कट होता असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला. तसेच आरोपींवर वरवरची कलमं येऊन त्यांना पाठीशी घालण्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावीत अशी मागणी राज्यभरातून होत आहे. विविध संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई केली तर सरकारला आणि पोलिसांना रोष पत्करावा लागेल अशी चर्चा आहे.
या प्रकरणात जे जखमी आहेत त्यांची तपासणी करुन पुढील कलमं लावायची की नाहीत याची चाचपणी पोलीस करत असल्याची माहिती आहे. मंगळवारी जर या प्रकरणात जखमींची वैद्यकीय प्रमाणपत्र हाती आली तर आरोपींवरील गुन्ह्याच्या कलमामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
शाईचे नमूने रासायनिक तपासणीसाठी
या प्रकरणात आरोपींनी प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाई फेकली आहे त्या शाईचे नमूने तसचे आरोपींकडील असलेल्या शाईचे नमूने हे रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या शाईची तीव्रता किती आहे, त्यातून जीविताला कितपत धोका यआहे याची तपासणी करुन कलमं वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ही सर्वच कारणे लक्षात घेता आरोपींना पोलीस अधीक्षकांसमोर हजर करण्यात आलं नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरोपींवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देणार की त्यांच्यावर गंभीर कलमं लावणार याचा निर्णय मंगळवारी घेण्यात येणार आहे.
दीपक काटेवर कोणते गुन्हे नोंद?
प्रवीण गायकवाडांवरील हल्लेखोर दीपक काटेवर सर्व जामीनपात्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वेच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमवणे, बेकायदेशीर जमावाचा सभासद असणे आणि मालमत्तेचं नुकसान हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा: