विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
बीड जिल्ह्यात कायमच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपने अनेक वर्षे दबदबा निर्माण केला होता.
बीड : विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा प्रथमच महायुती व महाविकास आघाडी असं समीकरण जुळलं आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील केज (Kaij) मतदारसंघात कोणाला पक्षाचं तिकीट मिळतं, याची उत्कंठा सर्वांनाच होती. अखेर, केज विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना तिकीट देण्यात आलं. तर, महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे यांना मैदानात उतरविण्यात आलं आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात यंदाही दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघांपैकी केज हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मुंदडा विरुद्ध साठे ही लढत निश्चित झाली असून मागील पाच वर्षांमध्ये विद्यमान आमदार नमिता मुंदडा (Namita mundada) यांच्याबद्दल मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यामुळे, या मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होत आहे.
बीड जिल्ह्यात कायमच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपने अनेक वर्षे दबदबा निर्माण केला होता. तर, क्षीरसागर आणि पंडीत यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनेही आपली पकड कायम ठेवली आहे. दरम्यान, येथील केज मतदारसंघाचा विचार केल्यास मुंदडा कुटुंबीयांने अनेकवर्षे आमदारकी मिळवली आहे. गत 2019 साली देखील नमिता मुंदडा यांचा सहज विजय झाला होता. तत्पूर्वी, 2014 मध्ये संगीता ठोंबरे केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली, त्यानंतर यंदाही भाजपने उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
लोकसभेला केज विधानसभेचा लीड कोणाला
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली होती. तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत होते. यंदा प्रथमच येथील मतदारसंघात जातीय समीकरण पाहायला मिळालं. आधीच राखीव असलेल्या या मतदारसंघात यंदा मराठा व ओबीसी समुहाने मतांचं ध्रुवीकरण झालं. त्यामध्ये, केज मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना 13 हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. दरम्यान, बजरंग सोनवणे यांचा 6,550 मतांनी विजय झाला आहे. तर, पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला.
केजमध्ये 2019 च्या निवडणुकीत काय घडलं
2019 साली केज मतदारसंघात भाजप नेत्या नमिता मुंदडा यांना 1 लाख 23 हजार 433 मतं मिळाली आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पृथ्वीराज साठे यांना 90,524 मतं मिळाली होती. त्यामुळे, या दोन्ही उमेदवारांतील मतांचे अंतर मोठं आहे. नमिता मुंदडा यांना तब्बल 33 हजार 09 मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय मोठा मानला जात आहे. मात्र, यंदा विधानसभा मतदारसंघातील गणित वेगळं आहे. कारण, राज्यासोबतच येथील मतदारसंघातही दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेले आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकी येथील मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळालं आहे.