धक्कादायक! जन्मदात्या पित्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; पत्नी मुलासह सुनेवर गुन्हा दाखल
Beed Crime News : जन्मदात्या बापाला आई व पत्नीच्या मदतीने विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
Beed Crime News : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतीच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला आई व पत्नीच्या मदतीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलगा, सून, पत्नी यांच्याविरोधात युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अशोक शहाजी ठोंबरे (वय 50 वर्षे) असे विष पाजण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक यांच्या पत्नी प्रेमकला, मुलगा अनंत ठोंबरे आणि सून शुभांगी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ठोंबरे यांचे गावात किराणा दुकान असून, त्यांची उंदरी शिवारात एकूण 12 एकर जमीन आहे. तर याच जमिनीवरून अशोक ठोंबरे यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा अनंत ठोंबरे याच्याशी न्यायालयात वाद सुरू आहे. दरम्यान, 2 जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अशोक ठोंबरे हे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले. त्यावेळी शेतात ठोंबरे यांची पहिली पत्नी प्रेमकला, मुलगा अनंत व त्याची पत्नी शुभांगी यांनी त्यांच्याशी वाद घातला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, तिघांनी अशोक ठोंबरे यांना लाकडी दांड्याने मारहाण केली.
पत्नी, मुलासह सुनेकडून करण्यात आलेल्या मारहाणीत ठोंबरे खाली पडल्यावर मुलगा आनंतने त्यांचा मोबाइल व चाव्या काढून घेतल्या. सून शुभांगी व पत्नी प्रेमकला यांनी त्यांचे दोन्ही हात धरले व अनंतने त्यांच्या तोंडात विषाची बाटली ओतली. या भांडणाची माहिती ठोंबरे यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा अजयला समजताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. अजयने त्यांना गाडीवर बसवून गावात आणले व युसूफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
उपचारादरम्यान पोलिसांना जबाब दिला
मुलाने विष पाजल्याने अशोक ठोंबरे यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना बरं वाटू लागल्याने 6 जुलै रोजी ठोंबरे यांनी उपचारादरम्यान पोलिसांना जबाब दिला. त्यांनी दिलेल्या जबाबावरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात अनंत ठोंबरे, प्रेमकला ठोंबरे व सून ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख अल्पवयीन मुलींकडून करून घ्यायचा वेश्याव्यवसाय; बीड पोलिसांकडून कारवाई