Beed Crime : तमिळनाडुमधून चोरलेल्या 1 किलो सोन्याचं बीड कनेक्शन, नांदुरघाटमध्ये कोट्यवधींचं सोनं विकलं अवघ्या 25 लाखाला, पोलिसांनी ट्रॅप लावला, पण...
Beed Crime : सखोल चौकशी केल्यानंतर चोरांनी सोने हे बीड जिल्ह्यातील नांदुर घाट येथील अनिल बडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याला विकल्याचे कबुल केले.

बीड: मागील काही दिवसापूर्वी तमिळनाडू राज्यामध्ये एक सराफ दुकान चोरट्यांनी लुटलं होतं. यामध्ये चोरट्यांनी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. या एक किलो सोन्याची किंमत तब्बल 1 कोटी रूपयांच्या घरात होती. चोरीचे सोने चोरांनी बीडच्या नांदुरघाट येथील सोन्याचे सराफ व्यापारी असलेल्या अनिल बडे याला विकले. एक कोटींच्या किमतीचे सोने अनिल बडे याने फक्त 25 लाख रूपयांना विकत घेतले. 25 लाखांपैकी अनिल बडे याने 14 लाख रूपये चोरट्यांना दिले होते. राहिलेले 11 लाख रूपये चोरट्यांना देणे बाकी होते. या प्रकरणाचा सखोल तपास तमिळनाडू पोलिसांनी केला. या चोरी प्रकरणी लातूर येथून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीचे सोने हे बीड जिल्ह्यातील नांदुर घाट येथील अनिल बडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याला विकल्याचे कबुल केले.
पोलिस तपासामध्ये तामिळनाडू राज्यातील चोरीचे सोने बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील व्यापाऱ्याला चोरांनी अवघ्या 25 लाखांना विकल्याचं सोमवारी (दि.17) उघडकीस आलं. तमिळनाडूचे पोलीस दोन दिवसांपासून बीडच्या सोनाराच्या शोधात नांदुरघाट येथे तळ ठोकून होते, पोलिसांना चोरीचं सोनं मिळालं, मात्र चोरीचे सोने खरेदी करणारा आरोपी घराच्या छतावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी तमिळनाडू राज्यातील एका सराफ दुकानातून चोरट्यांनी एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. या चोरीच्या सोन्याची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास होती. चोरट्यांनी हे चोरीचे सोने नांदुरघाट येथील सराफ व्यापारी अनिल बडे याला विकले होते. अनिल बडे याने चोरट्यांसोबत 25 लाख रुपयांची डील केली होती, त्यापैकी 14 लाख रुपये त्याने चोरट्यांना दिले होते, आणि उर्वरित 11 लाख रुपये देणे बाकी होते. तमिळनाडू पोलिसांनी या चोरीचा तपास करत लातूर येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं, चोरीचे सोने त्यांनी बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील अनिल बडे याला विकले.
त्यानंतर तमिळनाडू पोलिसांनी केज पोलिसांच्या मदतीने नांदुरघाट येथे सापळा लावला. पोलिसांनी अनिल बडे यांच्या घरावर छापा मारला, तेव्हा त्यांना घरात एक किलो सोने सापडले. मात्र, अनिल बडे घराच्या छतावरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला.
केज पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदुरघाट चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे, शमीम पाशा आणि इतर कर्मचाऱ्यांनी तमिळनाडू पोलिसांना मदत केली. सध्या अनिल बडेच्या पळून जाण्यामुळे त्याचा मागोवा घेतला जात आहे, आणि त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.























