Beed Crime : बीडच्या बाबासाहेब आगे हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी फपाळच्या पत्नीनं सगळंच सांगितलं; म्हणाली, माझ्या पतीने...
Beed Crime : बीडच्या माजलगाव तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.

Beed Crime : बीडच्या माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे (Babasaheb Aage Muder Case) यांची दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. भरदिवसा स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी नारायण शंकर फपाळ याने बाबासाहेब आगे यांची हत्या केल्यानंतर त्याने स्वतः माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हजर होत खून केल्याची कबुली दिली होती. आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी कार्यालयाकडे जात होते. यावेळी नारायण फपाळने आपल्या शर्टच्या पाठीमागे लपवलेला कोयता बाहेर काढत आगे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. काही क्षणातच बाबासाहेब आगे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांनी पाहिला, मात्र सगळं काही इतकं लवकर घडलं की, कोणीही काही करू शकले नाहीत. घटनेनंतर आरोपीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. प्राथमिक तपासात आर्थिक वादामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
आरोपीच्या पत्नीने सांगितलं हत्येचं खरं कारण
आता आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने हत्येचे खरे कारण सांगितले असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचे व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असे फपाळच्या पत्नीने म्हटले आहे. तर बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते, असे देखील या महिलेने सांगितले आहे.
पंकजा मुंडे घेणार बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट
दरम्यान, बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वीकारली आहे. बाबासाहेब आगे यांच्या हत्येने मन सुन्न झाले असून, मी एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे, अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. आज (दि. 19) मंत्री पंकजा मुंडे बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. घाटशीळ पारगाव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर, दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या माजलगाव येथे जाऊन बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करणार आहे.
आणखी वाचा























