Beed Crime News: बीड कोचिंग क्लास अत्याचार प्रकरणात महत्त्वाची अपडेट, 30 जणांची चौकशी, आरोपींना त्याच केबिनमध्ये नेऊन सीन रिक्रिएशन
Beed Crime News: उमाकिरण शैक्षणिक संकुलात 'नीट' ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पवार आणि खाटोकर यांनी एक वर्ष लैंगिक छळ केला.

बीड: बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ (Beed Crime News) प्रकरणात अटकेतील क्लास संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर यांचे उत्पन्नाचे स्रोत पोलिस तपासत आहेत. या दरम्यान झालेल्या तपासात संचालक विजय पवारने कर वाचवण्यासाठी खाटोकरला वेगळ्या क्लासचा मालक दाखवल्याचे समोर आले आहे. क्लासेसच्या शिक्षकांचे हजेरी पुस्तक, सुट्यांच्या नोंदी, विद्यार्थ्यांची हजेरी या बाबींचे रेकॉर्ड त्यांनी ठेवलेले नाही. उमाकिरण शैक्षणिक संकुलात 'नीट' ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पवार आणि खाटोकर यांनी एक वर्ष लैंगिक छळ (Beed Crime News) केला. दोन्ही शिक्षकांचे उत्पन्नाचे स्त्रोत पोलीस तपासले जाणार आहेत. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. यात 20 दिवसांचा डेटा आहे. मात्र घटना वर्षभराची असल्याने जुना डाटा रिकव्हर करण्यासाठी डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहेत. (Beed Crime News)
आरोपी शिक्षकांसोबत पोलिस घटनेचे रिक्रिएशन करणार
यातील पीडितेने घटनास्थळ दाखवले असून त्याचा पंचनामा झालेला आहे. याबाबत पीडितेने न्यायालयातही जबाब दिलेला आहे. आता पोलिस दोन्ही आरोपी शिक्षकांना सोबत घेऊन घटनेचे रिक्रिएशन करण्याची तयारी करत आहेत. नेमकी घटना कशी घडली? त्यात कशाप्रकारे आरोपींनी कायदा मोडला? कोणत्या बाबी सीसीटीव्हीत नोंद झाल्या? याची माहिती घेण्यासाठी पोलिस घटनेचे रिक्रिएशन करणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
उमाकिरण शैक्षणिक संकुलात नीटची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्यावरुन संचालक विजय पवार आणि शिक्षक प्रशांत खाटोकर या दोघांवर पोक्सोनुसार गुन्हा नोंद आहे. सध्या दोघेही पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षकांकडून शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे सोपविण्यात आला.
बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रात्र घालविलेल्या पवार, खाटोकरला शिवाजी नगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. इथे दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यांचा सीडीआर तपासला जात आहे. तसेच इंटरनेटचा वापर करुन काही कृत्य केले का, याबाबत तपास अधिकाऱ्यांनी इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र दिले आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपणार असून दुपारी या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.























