Aurangabad: पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाकडून कारवाई
पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या 290 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Action of Aurangabad Municipal Corporation: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे,नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे इ.प्रकारे पाण्याचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर महानगरपालिकेने थेट कारवाई करायला सुरवात केली आहे. पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या 290 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाच्यावतीने शहरातील सर्व नऊ झोन मध्ये पालक अधिकारी यांच्या देखरेखीखाली नियोजन करण्यात येत आहे. ज्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. मात्र असे असताना काही नागरीक जाणीवपूर्वक पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करत आहे. त्यामुळे 14 ते 31 मे या कालावधीत एकूण 1246 नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्यात 290 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच या नागरिकांना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे बाबत समज देण्यात आली व पिण्याचा पाण्याचा योग्य वापर करून पाणी बचत करण्याच्या सूचना देण्यात महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेवर ठेऊन...
या कारवाईबाबत बोलताना माहिती नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव म्हणाले की, शहरातील विविध भागात पालक अधिकारी पाणीपुरवठा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. विविध भागांत ते भेटी देऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सूचना देत आहेत. यावेळी पाणी पुरवठा विभाग अधिकारी कर्मचारी ,नागरी मित्र पथक कर्मचारी यांचा सहभाग असतो, अस जाधव म्हणाले.
पाणी टंचाई कायम...
शहरातील पाणी प्रश्न गेल्या महिन्याभरापासून गंभीर बनला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. काही प्रमाणात प्रशासनाला यश सुद्धा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही अनेक भागात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे याच पाण्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे.