Aurangabad Water Issue :औरंगाबादचा पाणी प्रश्न पेटला, भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'आधी राष्ट्रवादीचा 'घागर मोर्चा'
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी केली.
Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार असताना त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून भाजप आमदाराच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून घागर आंदोलन करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे आज सकाळी राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे, घागर घेऊन अनोखं आंदोलन केलं. यावेळी महिलांची मोठ्याप्रमाणत उपस्थिती पाहायला मिळाली. तर भाजपच्या नेत्यांमुळेच गेल्या 20 वर्षांपासून शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला.आतापर्यंत शहरातील पाणी प्रश्नावरून भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र आता राष्ट्रवादीने सुद्धा यात उडी घेतल्याने आगामी काळात शहरातील पाणी प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.
भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न...
शहरातील पाणी प्रश्नावरून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून सोमवारी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर पाणी प्रश्नावरून हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षाकडून प्रयत्न सुरु आहे. सुरवातीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणी पट्टी 50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीतील पक्षांनी धसका घेतल्याचं बोललं जात आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकारण...
आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणूका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेले अनेकवर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत सोबत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपडकून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केल्या जाण्याची शक्यता आहे.