Politics: 'पंकजाताईंवरचं प्रेम आहे की गेम'; 'मुंडें'च्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला संशय
Munde Politics: पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देताना डावलण्यात आले आहे.
Munde Politics: विधानपरिषदेची उमेदवारी देताना पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी असून, त्यांचा संताप पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अशाप्रकारे होणारे हल्ले पंकजाताईंवरचं प्रेमापोटी होत आहे की कुणी गेम करत आहे, असा प्रश्न पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय तथा भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना घुगे म्हणाले की, औरंगाबादमध्ये भाजपच्या कार्यालयावर आणि भागवत कराड यांच्या कार्यालयावर जो हल्ल्याचा प्रकार घडला, हे पंकजा मुंडे यांच्या प्रेमापोटी घडलं आहे की, एखादा कट आहे हेच लक्षात येत नाही. त्यामुळे हे पंकजाताईंवरचं प्रेम आहे की गेम आहे हा खरा संशोधनाचा भाग असल्याच घुगे म्हणाले. भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे यांच्याबद्दल योग्य तो विचार करेल आणि ताई या सगळ्या विषयावर दिशा देतील असा मला विश्वास असल्याच घुगे म्हणाले.
कराडांची प्रतिक्रिया...
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर यावर आता कराडांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांना सांगून सुद्धा काही लोकं कार्यालयावर येतात, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे पोलिसांचे दुर्लक्ष म्हणावे लागेल. त्याच कार्यकर्त्याने तीन दिवसांपूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला केला होता आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न केला होता. आता सुद्धा माझं कार्यालय फोडायला येत असल्याचं सांगतोय तरीही पोलीस लक्ष घालत नाही. पोलीस असं का करत आहेत याचं मला संशय येत असल्याच कराड म्हणाले. एक-दोन वेळा सांगून सुद्धा त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. त्यामुळे रात्री पोलीस आयुक्त यांना बोललो असून, आजही बोलणार असल्याच कराड म्हणाले.
पोलिसात गुन्हा दाखल...
भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ ते दहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या दोन जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्लेखोरांना मारहाण करणाऱ्या अनोळखी आठ ते दहा लोकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.