Aurangabad: औरंगाबादमध्ये काँग्रेसला धक्का! जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाजपमध्ये करणार प्रवेश
Aurangabad: भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Aurangabad News; आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले असताना, औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, त्यावेळी शेळके या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सुद्धा काँग्रेसकडे होते. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे स्थानिक राजकीय परिस्थिती सुद्धा बदलताना पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर फुलंब्री तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
बागडेंच्या उपस्थितीत प्रवेश
भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे अनेक महत्वाचे नेते सुद्धा उपस्थितीत राहणार आहे. तर रामराव शेळके आणि मीना शेळके यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषडेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.