Aurangabad: गुंतवणुकीसाठी आलेली चीनची कंपनी खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी; पाच मंत्री असलेल्या जिल्ह्याची अवस्था
Aurangabad : चिनी उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
Aurangabad News : आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यातच आता औरंगाबादमध्ये नव्याने उभी राहत असलेल्या ऑरिक सिटीमुळे हे शहर जागतिक चर्चेत आला आहे. पण शहराच्या याच वेगाने होणाऱ्या विकासात रस्त्यांवरील खड्ड्यांनी मात्र खोडा घातला आहे. धक्कादायक म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी आलेले चिनी उद्योगांचे पथक हे पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरल्यामुळे औरंगाबादची मोठी नाचक्की झाली आहे.
दिल्ली- मुंबई कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी उभारण्यासाठी एकूण 10 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीनमध्ये उद्योग विकासाचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे शेंद्रा येथील दोन हजार एकरपैकी आतापर्यंत जवळपास 97 टक्के जागांचे वाटप झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच उद्योगांना बिडकीनमध्ये जागा देण्याचे नियोजन आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाणार होते. मात्र औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाण्यासाठी पथक निघाले असताना रस्त्यात वाहतुकीची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.
पाच मंत्री असलेल्या जिल्ह्याची अवस्था...
औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. आतापर्यंत अनेकदा उद्घाटने झाली पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही. औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे.
मुख्यमंत्र्यांचा याच रस्त्यावरून दौरा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती विसर्जनानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी त्यांची पैठणला जाहीर सभा होणार आहे. यासाठी त्यांना औरंगाबाद-पैठण महामार्गावरून जावे लागणार आहे. त्यामुळे किमान या दौऱ्यानिमित्ताने तरी या रस्त्याची अवस्था त्यांना कळेल अशी चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे दुसऱ्यांदा उद्घाटन केले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला कधी सुरवात होणार हे पाहणं महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: औरंगाबादकरांसाठी सुवर्णकाळ पाच मंत्र्यांसह 'विरोधी पक्षनेते' पदही मिळाले
Swine Flu Causes: दोन दिवसांत स्वाइन फ्लूच्या 8 रुग्णांची वाढ; औरंगाबादकरांची चिंता वाढली