Aurangabad: औरंगाबादकरांसाठी सुवर्णकाळ पाच मंत्र्यांसह 'विरोधी पक्षनेते' पदही मिळाले
Aurangabad: शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादला तीन मंत्रिपद मिळाले.
Aurangabad News: मंगळवारी राज्यात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून, आगामी काळ औरंगाबादकरांसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच औरंगाबाद जिल्ह्याला पाच मंत्रीपद आणि एक विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या रूपाने औरंगाबाद जिल्ह्याला विरोधीपक्ष नेतेपद पहिल्यांदा मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचं बोलले जात आहे.
तीन कॅबिनेट मंत्री...
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील 3 मंत्रीपद एकट्या औरंगाबादच्या वाट्याला आले आहेत. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तिघांनी यापूर्वी सुद्धा मंत्रीपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांच्या याच अनुभवाचा फायदा आगामी काळात औरंगाबादच्या विकासासाठी होण्याची शक्यता आहे.
दोन केंद्रीय मंत्रिपद...
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असतांना दुसरीकडे, औरंगाबादला दोन केंद्रीय मंत्रीपदा सुद्धा लाभले आहेत. राज्यसभेवर खासदार असलेले भागवत कराड यांच्या रूपाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि रावसाहेब दानवे यांच्या रूपाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री औरंगाबादला मिळाले आहेत. त्यामुळे एकट्या औरंगाबादला आता पाच मंत्रीपद मिळाले आहे. तर आगामी मंत्रिमंडळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते पदही औरंगाबादकडे...
मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्याला एकाचवेळी तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असतानाच त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याने. विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांची मंगळवारी अधिकृतरीत्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्याला सुद्धा मंत्र्याचा दर्जा असतो. त्यामुळे औरंगाबादसाठी मंगळवार एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे.
पाणी प्रश्न सुटणार का?
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी याच पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळाले होते. तर भाजपकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आता औरंगाबादला पाच मंत्रिपद आणि एक विरोधी पक्षनेता मिळाला असतांना शहरातील पाणी प्रश्न सुटणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.