(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: औरंगाबादमध्ये पुरोहिताची हत्या, घटनास्थळी आढळली चिलीमसह गांजाच्या झाडाची पाने
Crime News: पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या, तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूरमध्ये पुरोहिताची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर हरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या 55 वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. हत्येचा उलगडा अद्याप झाला नसला तरी, पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या, तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले. कैलाश गणपत चव्हाण (रा. बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर) असे खून झालेल्या पुरोहिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात गवळीबाबा मंदिर आहे. या मंदिराजवळ असलेल्या एका झोपडीत पुरोहित कैलास चव्हाण वास्तव्यास होते. गेल्या दीड वर्षांपासून या मंदिरात पौरोहित्य करून ते तेथेच राहत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील एका शेतकऱ्यास मंदिराच्या पाठिमागील बाजूस पुरोहिताचा मृतदेह दिसला. त्याने घटनेची माहिती तात्काळ वैजापूर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चव्हाण यांचा मृतदेह गवळीबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या झाडाझुडुपात पोलिसांना आढळून आला. पाहणीदरम्यान घटनास्थळी पोलिसांना रक्ताचे डाग, सायकल व थोड्याच अंतरावर काठीही आढळून आली. याशिवाय याच ठिकाणी असलेल्या एका पिशवीत 'वशीकरण' शीर्षक असलेले पुस्तकही पोलिसांना आढळून आले.त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करत, पुढील तपास सुरु केला आहे.
घटनास्थळी चिलीमसह गांजाच्या झाडाची पाने
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी चिलीम, गांजाच्या झाडाची पाने व सायकलही आढळून आले. त्यामुळे गुरूवारी रात्री पुरोहितासोबत अन्य कुणीतरी घटनास्थ होते, असाही संशय पोलिसांनी वर्तविला. पुरोहिताचा खून कुणी, कशासाठी व का केला? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर गुरुवारी रात्री मंदिर परिसरात आरडाओरड सुरू होती, असे काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
हत्येच्या दृष्टीने पोलिसांचा तपास...
कैलाश चव्हाण यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. सोबतच पुरोहिताच्या हातासह डोक्यावर मारहाणीच्या खूणा दिसून आल्या, तसेच घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले. तर परिसरातील नागरिकांना मध्यरात्री मंदिर परिसरात आरडाओरड ऐकू येत होती. त्यामुळे कैलाश चव्हाण यांची हत्या झाली असल्याचं स्पष्ट होत असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे.