आठ तासांच्या भीषण चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर
Aurangabad: चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर 18 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
Aurangabad News: औरंगाबाद ग्रामीण पोलिसचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (Gallantry Medal) जाहीर झाला आहे. सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक म्हणुन गडचिरोली येथे कार्यरत असतांना त्यांनी आठ तासांच्या भीषण चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र-छत्तीसगढ सिमेवर किसनेली गावाजवळ 60 ते 70 नक्षल असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत माहिती मिळताच तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, यांच्या नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह 15 किमी घनटाद जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. सर्च ऑपरेशन सुरु असतानाच नक्षलांनी पोलीसांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्याने प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला.
आठ तास भीषण चकमक चालली
नक्षलांनी गोळीबार करताच यावेळी मनिष कलवानिया यांच्यासह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला. या ठिकाणी पोलीस आणि नक्षल यांची 8 तास भीषण चकमक चालली. मात्र पोलीसांचा वाढता दबाब पाहुन तेथून नक्षली पळुन गेले. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणाची पाहणी केली असता तेथे 5 जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा,कुकर बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य मिळुन आले होते.
ठार झालेल्या नक्षलवादयावर 18 लाखांचे बक्षीस
नक्षल विरोधात राबवण्यात आलेल्या या अभियानामध्ये मनिष कलवानिया आणि त्यांच्या सी-60 कमांडो पथकाला टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन 15 मधील जहाल नक्षलवाद्यांना टिपण्यात यश आले होते. विशेष म्हणजे चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 18 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यांच्या याच साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत देशाच्या राष्ट्रपती यांच्याकडुन शौर्य पदक (Gallantry Medal) जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.
आणखी तिघांच्या उत्कृष्ट कार्याची दखल...
कलवानिया यांच्याप्रमाणेच औरंगाबाद येथील पोलीस दलातील आणखी तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याचा चाकू हल्ल्यात जखमी झालेले जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 1987 ते 1992 या कालावधीत नांदेड येथे जहाल नक्षलवादी विजयकुमार उर्फ शामराव किनाके याच्या एन्काऊंटरच्या कारवाईत उत्कृष्ट कामगिरी केंद्रे यांनी बजावली होती. पोलीस दलातील त्यांच्या याच निष्कलंक कार्यासाठी राष्ट्रपती पदक देण्यात आले आहे.
सोबतच शहर पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील आणखी दोन अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष जगन्नाथ जोशी आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा उत्तमराव हिरवनकर अशी या अधिकाऱ्यांची नावें आहेत. जोशी हे 2008 पासून बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहे. तर हिरवनकर रेडीओ यांत्रिकी म्हणून काम पाहतात.